सणांच्या निमित्ताने होणारी चित्रपटांची गर्दी तशी नवीन नाही, पण आजची गर्दी ही केवळ आकडा नाही, तर वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांनी तिकीटबारीवर एकच गर्दी केली आहे. त्यामुळे अजि सोनियाचा दिनू.. अशीच अवस्था निर्माण झाली आहे. हिंदीत दिग्दर्शक अमित मसूरकरचा दुसरा चित्रपट ‘न्यूटन’ प्रदर्शित झाला आहे. संजय दत्तचा बहुचर्चित आणि पुन:पदार्पणाचा चित्रपट म्हणता येईल असा ‘भूमी’ आणि श्रद्धा क पूरची मुख्य भूमिका असलेला ‘हसीना’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मराठीत ‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘नदी वाहते’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला असून ‘अनान’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
न्यूटन
न्यूटन कुमार या सरकारी कारकुनाचा हा गमतीशीर पण त्याच्या माध्यमातून आपले समाजमन आणि सरकारी यंत्रणेवर अचूक बोट ठेवणारा हा चित्रपट आहे. राजकुमार रावची कारकीर्द सध्या बहरात आहे. एकापाठोपाठ एक हटके चित्रपट करणाऱ्या राजकुमारचा हा आणखी एक सुंदर चित्रपट आहे. राजकुमारबरोबर अंजली पाटील, पंकज त्रिपाठी आणि रघुवीर यादव यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
भूमी
संजय दत्तचा चित्रपट असल्याने ‘भूमी’ हा अॅक्शनपटच असू शकतो. सूडनाटय़ हा या चित्रपटाचा मुख्य बिंदू आहे. ओमंग कुमार निर्मित, दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त आणि आदिती राव हैदरी हे दोघेही बापलेकीच्या भूमिकेत आहेत. सिद्धांत गुप्ता आाणि शरद केळकर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हसीना
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या बहिणीच्या आयुष्यावर आधारित ‘हसीना’ हा अपूर्व लाखिया दिग्दर्शित चित्रपट क्राइम ड्रामात रस असणाऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. श्रद्धा कपूरने या चित्रपटात हसीनाची भूमिका केली आहे. आपल्या ग्लॅमरस भूमिकांची चौकट मोडून ती पहिल्यांदाच अशा प्रकारची चरित्र व्यक्तिरेखा साकारते आहे. श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूरने यात दाऊदची भूमिका केली आहे. आधी सर्वसामान्य तरुणी ते एक काळ गुन्हेगारी जगतात आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या हसीनाच्या गोष्टीबरोबर मुंबईतील गुन्हेगारी जगताचा इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उलगडला आहे.
नदी वाहते
नवीन पण वास्तव विषय, नवीन चेहरे अशी ताजी मांडणी घेऊन आलेला ‘नदी वाहते’ हा संदीप सावंत दिग्दर्शित चित्रपट मराठीतील वेगळ्या चित्रपटांच्या प्रवाहाला साजेसा असा चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा, संवाद, दिग्दर्शक अशा तिन्ही आघाडय़ा संदीप सावंत यांनीच सांभाळल्या असून चित्रपटाच्या नावावरून त्याच्या विषयाची सहज कल्पना येते. पूनम शेटगांवकर, आशा शेलार, हृदयनाथ जाधव, अभिषेक आनंद, जयंत गाडेकर अशा चौकटीबाहेरच्या कलाकारांची मोट बांधून हा चित्रपट दिग्दर्शकाने प्रेक्षकांसमोर आणला आहे.
अनान
‘अनान’ हा शास्त्रीय नृत्याची संकल्पना मध्यवर्ती ठेवून गुंफण्यात आलेला चित्रपट आहे. रोहन थिएटर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कुश्टे यांनी केले असून प्रार्थना बेहरे, ओमकार शिंदे, सुयोग गोऱ्हे, सुखदा खांडकेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.