‘ब्लॅक पँथर’ या सुपरहिरोने अनपेक्षितरीत्या हॉलीवूड सिनेसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. एक एक करत त्याने ‘टायटॅनिक’सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले, त्यामुळे आज जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख केला जात आहे. शिवाय, ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ला गेली अनेक वर्षे भेडसावणाऱ्या ‘आयर्नमॅन’ला पर्याय कोण?, या प्रश्नावर उत्तराच्या स्वरूपात ‘ब्लॅक पँथर’चा उल्लेख केला जातो आहे. परंतु जगभरातील ९०टक्क्यांपेक्षा जास्त समीक्षकांकडून गौरवण्यात आलेल्या या सुपरहिरोवर अभिनेता सॅम्युएल जॅक्सन मात्र अद्याप खूश नाहीत.‘माव्र्हल’ने आपले सुपरहिरोपट एकमेकांशी जोडून घेण्यासाठी मुख्य पटकथेत ‘शिल्ड’ या कंपनीचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच सुपरहिरो हे शिल्डचे सभासद आहेत. ‘निक फ्यूरी’ हे शिल्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष असून त्यांच्याच देखरेखीखाली सुपरहिरो आपापली भूमिका बजावतात. ‘निक फ्यूरी’ ही व्यक्तिरेखा सध्या सॅम्युएल जॅक्सन साकारत आहेत. या पाश्र्वभूमीवर विचार करता सॅम्युएल यांनी ‘ब्लॅक पँथर’च्या बाबतीत घेतलेली अलिप्त भूमिका चाहत्यांना काहीशी आश्चर्यात टाकणारी आहे. ‘ब्लॅक पँथर’ प्रदर्शित झाल्यापासून त्याच्यावर कौतुकांचा अक्षरश: वर्षांव होत आहे, परंतु आजवर मौन बाळगलेल्या सॅम्युएल यांनी शेवटी एका मुलाखतीदरम्यान आपले तोंड उघडले आणि सर्वानाच धक्का दिला. त्यांच्या मते दोन सुपरहिरोंची तुलना करणे योग्य नाही, कारण दोघांची शक्ती, समस्या आणि त्यांचा आवाका हा भिन्न स्वरूपाचा असतो. शिवाय सुपरहिरो साकारणाऱ्या कलाकारांच्या अभिनयाच्या दर्जातदेखील तफावत असते. त्यामुळे उगाचच ‘आयर्नमॅन’ची तुलना ‘ब्लॅक पँथर’शी करणे त्यांना योग्य वाटत नाही. परंतु तरीही हे सर्व एकाच पठडीतले चित्रपट असल्यामुळे चाहत्यांनी त्यांची तुलना केल्यास काही विशेष फरक पडत नाही. पण काही मूर्खानी ही तुलना ‘कॅसाब्लांका’, ‘टायटॅनिक’, ‘अवतार’, ‘द गॉडफादर’, ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’सारख्या अजरामर चित्रपटांबरोबर केल्याबद्दल सॅम्युएल जॅक्सन यांनी संताप व्यक्त केला आहे. आणि हा संताप आता अस्’ा झाल्यामुळे शेवटी त्यांनी आपले तोंड उघडले. ‘पँथर’ हा एक चांगला चित्रपट आहे. परंतु तो सर्वोत्कृष्ट चित्रपट नाही. या मताशी सॅम्युएल ठाम आहेत. कारण त्यात केला गेलेला अभिनय अगदी सुमार दर्जाचा आहे. शिवाय ज्या चित्रपटांशी त्याची तुलना केली जात आहे. त्या चित्रपटांनी थेट ऑस्कपर्यंत मजल मारली होती. त्यांच्या पटकथेत वैविध्य होते. सहजता हा त्या चित्रपटांचा खरा गुणधर्म होता. परंतु पँथरने केवळ आक्रमक जाहिरातींच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यामुळे मोठय़ा बॅनरखाली असलेला एक सामान्य चित्रपट या शब्दात पँथरचे वर्णन त्यांनी केले. शिवाय पँथरची ही सुरुवात आहे आणि अजून त्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे आताच एखादा सामना खेळलेल्या खेळाडूला संघाचा कर्णधार घोषित करावे तसे ‘आयर्नमॅन’नंतर फक्त ‘ब्लॅक पँथर’च हे काही योग्य वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2018 रोजी प्रकाशित
निक फ्यूरी ‘ब्लॅक पँथर’वर अद्याप नाखूशच
माव्र्हल’ने आपले सुपरहिरोपट एकमेकांशी जोडून घेण्यासाठी मुख्य पटकथेत ‘शिल्ड’ या कंपनीचा वापर केला आहे
Written by मंदार गुरव
Updated:

First published on: 15-04-2018 at 03:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick fury unhappy on black panther movie