अभिनेत्री प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं. वयात १० वर्षांचं अंतर असल्याने प्रियांका व निक यांच्या नात्याबद्दल नेहमी चर्चा होत असते. प्रियांका आणि निक यांच्या लग्नाला ६ वर्षे झाली असून त्यांना मालती मेरी जोनास नावाची मुलगी आहे.

प्रियांका व निक यांची लाडकी लेक मालती मेरी फक्त तीन वर्षांची आहे. ती प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. प्रियांका व निक कधीकधी तिचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अलीकडेच निकने त्याच्या मुलीशी संबंधित काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

कराटे क्लासला जाते मालती…

प्रियांका व निक जोनासची ३ वर्षांची मुलगी मालती कराटे क्लासला जाते. तिला तिचा पहिला बेल्टही मिळाला आहे यावर तुम्हाला विश्वास बसेल का? हो, निकने स्वतः एका पॉडकास्टमध्ये मुलीबद्दल सांगितलं आहे. निकने रीयसएक्सएमच्या अँडी कोहेन लाईव्ह पॉडकास्टमध्ये माहिती दिली. “ती ३ वर्षांची आहे. ती नर्सरी स्कूलमध्ये आहे, ती कराटे शिकते, तिला तिचा पहिला बेल्ट देखील मिळाला आहे”, असं निक म्हणाला. त्याच मुलाखतीत निक जोनासने आपल्या पत्नीचे कौतुक केले आणि तिला एक चांगली गायिका म्हटलंय. प्रियांका सध्या भारतात शूटिंग करत असल्याचेही त्याने सांगितले.

प्रियांका चोप्रा ही एक लोकप्रिय बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनय कौशल्यामुळे जगभरात ओळख मिळवली आहे, दुसरीकडे, निक एक प्रसिद्ध गायक आहे. अशा परिस्थितीत, निकने काही काळापूर्वी खुलासा केला होता की त्याची मुलगी देखील मनोरंजन जगात प्रवेश करेल. मालतीला जे काही करायचं आहे, ते तिला करू देणार असल्याचं निक यापूर्वी म्हणाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निकने सर्वात आधी २०१६ मध्ये ट्विटरवर प्रियांकाला मेसेज केला होता. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली. २०१७ मध्ये दोघं समोरासमोर पहिल्यांदा भेटले होते, त्यानंतर वर्षभराने त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर ३ वर्षांनी १५ जानेवारी २०२२ रोजी प्रियांका आणि निकने सरोगसीच्या माध्यमातून मुलीचं स्वागत केलं.