कसे आहात सगळे, हसताय ना.. हसायला पाहिजे.. असं आपुलकीने विचारणारा नीलेश साबळे म्हणजे अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्त्व. ‘फू बाई फू’ ते ‘चला हवा येऊ द्या’ या प्रवासात तो प्रेक्षकांसमोर अँकर म्हणूनच आला आहे. खरं तर ‘कोणताही शिक्का नको’ असं कलाकाराचं नेहमी म्हणणं असतं. पण नीलेशला मिळालेला ‘अँकर’ हा शिक्का त्याला पसंत आहे.

* ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम इतका मोठा, लोकप्रिय होईल असं सुरुवातीला वाटलं होतं का?

असं अजिबातच वाटलं नव्हतं. एक प्रयोग म्हणूनच या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. ‘फू बाई फू’ मध्ये मी अँकिरग करायचो त्यावेळी काहीतरी वेगळं करावं असं सतत वाटायचं. त्यावेळी ‘लय भारी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुख आले होते. त्यावेळी त्यांनी हिंदीसारखे मराठीतही प्रमोशन करणारे कार्यक्रम असावेत असं सुचवलं. त्यासाठी त्यांनी माझं नाव सुचवलं. कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी मी झी मराठीच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा कळलं की हा संपूर्ण कार्यक्रम दोन दिवसांत उभा करायचाय. शिवाय याचं लेखन, दिग्दर्शनही मीच करायचंय. या शोनंतर प्रेक्षकांची पहिली प्रतिक्रिया येणार की हिंदीतल्या एका शोची कॉपी केलीय. ते स्वाभाविक होतं. त्याहून वेगळं काय करता येईल हे मोठं आव्हान होतं. झी मराठीतील संदेश घुगे यांनी त्यावेळी मला छान सांगितलं होतं. ‘कधी कधी काही गोष्टी नशिबाने आपल्याकडे येत असत. त्यावेळी ते कठीण वाटतं. अशा वेळी धाडस करणं गरजेचं असतं. हा शो कदाचित तुझ्या आयुष्यातला टर्निंग पाँइंट ठरू शकतो.’ ‘फू बाई फू’मधल्या काही कलाकारांना दूरध्वनी केले. या नव्या शोमध्ये काम करण्याची सगळ्यांची इच्छा होती पण तारखांची अडचण होती. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची वेळ मिळाली. मी, भाऊ आणि कुशलने हा शो डिझाइन केला. तो इव्हेंट स्वरूपात दाखवायचं ठरलं. चॅनलकडून कौतुक झालं आणि तो नियमित शो म्हणून सुरू ठेवायचा असं ठरलं. तीस एपिसोड्स करायचे असं ठरलं आणि त्यानंतर कार्यक्रम सुरूच राहिला.

[jwplayer v3i8cWFS]

* या संपूर्ण प्रवासात एक कलाकार म्हणून तुला काय मिळालं?

लहानपणापासून मला जे करायचं होतं ते मला ‘चला हवा येऊ द्या’मुळे करायला मिळतंय. पहिलीत असल्यापासून मी रंगमंचावर काम करतोय. शाळेच्या गॅदिरगमध्ये काम करायचो. पाचवीनंतर ते गॅदिरग अगदी टिपिकल होतंय असं वाटू लागलं. तेव्हापासून मी लिहायला लागलो. गॅदिरगमध्ये मी प्रहसने लिहायचो. त्या त्या वयानुसार त्यातला आशय असायचा. यामुळे लोकांना हसू यायचं. नारदमुनींची मुलाखत, मायकेल जॅक्सनसारखं सायकल जॅक्सन हे पात्र लिहून त्याची मुलाखत अशी ही प्रहसने असायची. तेव्हापासूनच अशा काहीतरी भन्नाट कल्पना डोक्यात यायच्या. पूर्वी न मिळालेलं व्यासपीठ ‘चला हवा..’च्या निमित्ताने मिळालं. इथे मला सगळं करता आलं. महाराष्ट्रात आजही ग्रामीण-शहरी असे दोन प्रेक्षक आहेत. दोन्ही प्रेक्षकांना आवडेल  असा कार्यक्रमाचा आशय असण्याचा मी प्रयत्न करू लागलो.

* दिग्दर्शन, लेखन आणि अभिनयासह तू संकलकाचीही भूमिका बजावतोस. तुझ्या संकलनाच्या आवडीबद्दल प्रेक्षकांना फारसं माहीत नाही..

आधीपासूनच संकलनाची आवड होती. खरं तर मला सिनेमातले सगळेच विभाग आवडतात. दहावी-अकरावीत असताना मी भोरमध्ये शिकायला गेलो होतो. तिथे सिनेमांचं चित्रीकरण व्हायचं. ते बघायचो. क्रेन कशी जोडतात, लाइट्स कसे लावतात, सेट डिझायन कसे करतात याचं निरीक्षण करायचो. कालांतराने भ्रमणध्वनीवर लघुचित्रपट बनवायला सुरुवात केली. त्यात असलेल्या एडिटिंग सॉफ्टवेअरवर एडिटिंग करू लागलो. संगणकावर चित्रपट अधेमधे थांबवून, रिवाइंड-फॉरवर्ड करत बघायचो. त्यातल्या बारकाव्यांचं निरीक्षण करायचो. ही सगळी शिकण्याची प्रक्रिया होती. तेव्हापासूनच माझ्या डोक्यात अनेक गोष्टी यायच्या. या कार्यक्रमात मला ते सगळं करायला मिळतंय. पहिल्या एपिसोडपासून आत्तापर्यंतच्या सगळ्या भागांचे संकलन मीच केलं आहे.

* हा कार्यक्रम सुरू असताना चित्रपट, नाटक यांच्या ऑफर्स आल्या नाहीत का?

चित्रपट आणि मालिकांच्या ऑफर्स आल्या; पण मी त्या नाकारल्या. दुसऱ्या कोणत्याही इव्हेंटच्या अँकरिगंचंही काम मी घेतलं नाही. पूर्ण वेळ ‘चला हवा येऊ द्या ला’ द्यायचा असं मी ठरवलं होतं. काही मोजक्या मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत त्यात ‘चला हवा..’ चंही नाव असावं असं मला वाटतं. मुंबई-पुणे-मुंबई असा माझा प्रवास सतत सुरू असतो. या प्रवासात मी लिखाण करतो. एकीकडे संकलन सुरू असतं. दुसरीकडे विषयांचं शोधकाम सुरू असतं. रविवार कुटुंबासाठी राखीव असतो.

* बॉलीवूडचे बडे कलाकार कार्यक्रमात हजेरी लावताहेत. हे कलाकार स्वत:हून येताहेत की यात तुम्ही पुढाकार घेताय? 

यामध्ये आम्ही पुढाकार घेतोय, असा प्रेक्षकांमध्ये मोठा गरसमज आहे. बॉलीवूड कलाकारांमधून सर्वप्रथम सोनम कपूर आमच्या शोमध्ये आली. सिनेमाचं प्रोडक्शन हाऊस प्रमोशनला जाणार असलेल्या शोचं रेटिंग, त्याची लोकप्रियता तपासतं. ‘नीरजा’ या सिनेमाच्या प्रॉडक्शन हाऊसनेही हे सर्वेक्षण केलं होतं. त्यात आमच्या शोची लोकप्रियता त्यांना दिसली. म्हणून ती आमच्या शोमध्ये आली. त्यानंतर शाहरुख खानचा ‘फॅन’ हा सिनेमा आला. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसकडूनही विचारणा झाली. त्यावेळी मला असं कळलं होतं की शाहरुखने सिनेमाचं प्रमोशन कुठे आणि कसं करू शकतो याबद्दल चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील वितरकांची एक बैठक घेतली होती. त्यात वितरकांनी आमच्या शोचं नाव सुचवलं होतं. अशा प्रकारे पुढे एकेक कलाकार येत गेले. आता हिंदीतल्या बहुतांशी बॅनर्स आणि प्रॉडक्शन हाऊसच्या यादीत आमच्या शोचं नाव असतं.

* कौतुक आणि टीका अशा दोन्ही प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत येत असतील. या प्रतिक्रियांबद्दल काय सांगशील?

९० टक्के कौतुक करणाऱ्या तर १० टक्के टीका करणाऱ्या प्रतिक्रिया असतात. विनोदाच्या दर्जाबद्दल आम्हाला निरनिराळ्या प्रतिक्रिया येत असतात. मुद्दा हा असतो की आमचं मत, प्रतिक्रिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. आमच्याकडे आलेल्या सर्व प्रतिक्रियांचा आम्ही विचार करतो. मध्यंतरी सिनेमाचं प्रमोशन खूप होतंय असं पत्र मिळालं. आम्ही त्याचं प्रमाण कमी करून वेगवेगळे कार्यक्रम केले. केवळ प्रहसने न करता पत्र, गाणी अशा काही नवीन गोष्टी सुरू केल्या. पुरुष कलाकार स्त्री व्यक्तिरेखा साकारण्यावरही प्रतिक्रिया येतात. ‘तुम्ही स्त्री कलाकारच का घेत नाही’ असं त्यात असतं. ही अपेक्षा बरोबर आहे. पण त्यातून विनोद घडणार नाही. जिथे व्यंग तिथे विनोद. चांगल्या अर्थाने व्यंग. म्हणूनच व्यंगचित्र बघून आपसूकच हसू येतं. आजवर आम्ही स्त्री व्यक्तिरेखा साकारताना हिडीस, ओंगळ असं केलं नाही. महिलांचा अपमान होईल अशी वर्तणूक दाखवत नाही. तालीम करताना तसं आढळून आलं तर त्यात आम्ही बदल करतो. स्त्री म्हणून वावरताना कसं वागलं पाहिजे, बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, याचाही आम्ही विचार करतो. काहीचं म्हणणं असतं कार्यक्रमातला विनोद बंद करून फक्त मुलाखती ठेवा. तर काहींना विनोद आवडतो. त्यामुळे दोन्हीची सांगड घालावी लागते. हा शो खासगी शो आहे. तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यामागे उत्पन्न आणि व्यावसायिक हे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. सर्व प्रतिक्रियांचा विचार करता त्यातून सुवर्णमध्य साधण्याचा नेहमी प्रयत्न असतो.

* ‘चला हवा..’ संपल्यानंतर पुढे काय करायचं ठरवलं आहे?

चित्रपट! लेखन-दिग्दर्शन-अभिनय असं सगळंच त्यात करायचंय. माझ्यातला अभिनेता अजून प्रेक्षकांपर्यंत आलाच नाही. तो त्यांच्यासमोर आणायचा आहे.

* ‘अँकर’ असा शिक्का बसलाय असं वाटत नाही का?

‘फू बाई फू’चं अँकरिगं करत असताना अनेकांनी मला सांगितलं होतं की सारखं अँकिरग करू नकोस. त्याचा शिक्का बसेल. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला तोच शिक्का हवाय. अभिनेता म्हणून टिकणंही आता आव्हानात्मक आहे. स्पर्धा वाढली आहे. मालिका संपली की ते कलाकार कुठे गेले असा प्रश्न उरतो. माझंही कदाचित असंच होणार. हेच मला नको होतं. म्हणूनच मला निवेदन क्षेत्रात प्रस्थापित व्हायचं होतं. त्यामुळे ते अचूकपणे करायचं असं मी ठरवलं. मला लेखन, दिग्दर्शन येतंय हे मी जाणलं. त्यामुळे मला काम मिळणार नाही असं होणार नाही, याची खात्री पटली. मालिकेतल्या व्यक्तिरेखेपेक्षा मला माझ्या नावाने प्रेक्षक ओळखतात आणि हे शक्य झालं ते मी करत असलेल्या अँकिरगमुळेच!

* कार्यक्रमांमध्ये केली जाणारी प्रायोजकांच्या ब्रॅण्डची जाहिरात प्रेक्षकांना खटकते.

याबद्दलही आम्हाला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांना अशा प्रकारची जाहिरात आवडत नसे. या गोष्टी प्रायोजकांकडून येतात. त्यात लेखक-दिग्दर्शकाचा सहभाग नसतो. अशा भागांमध्येही थोडा विनोद असावा असं माझं म्हणणं असायचं. पण प्रायोजकांना विनोदाचा भाग पटायचा नाही. त्याचा परिणाम ब्रॅण्डवर होतो असं त्यांचं म्हणणं असतं, जे योग्य आहे. म्हणून त्यात बदल केला. कार्यक्रमात आलेल्या एखाद्या पाहुण्यासाठी एक मानपत्र वाचलं जातं आणि त्या ब्रॅण्डची भेटवस्तू दिली जाते. प्रायोजक आणि प्रेक्षक हे दोघे आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे दोघांनाही एकावेळी खूश ठेवणं आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. पण, ही प्रक्रिया समाधान देणारी आहे.

[jwplayer 2wTdAIn1]