Aspirants Fame Actor Says Seniors behave badly With Crew : अभिनय क्षेत्रात अनेक कलाकार काम करीत असतात. प्रत्येकाचे विचार, स्वभाव एकमेकांपासून वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचं ते काम करत असलेल्या लोकांबरोबर जमतंच, असं नाही. त्याबद्दल काही कलाकारांनीसुद्धा मुलाखतींमधून सांगितलेलं आहे. अशातच आता ‘अॅस्पिरंट्स’ (Aspirants) या लोकप्रिय वेब सीरिजमधून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्यानं इंडस्ट्रीत काम करण्याचा त्याचा अनुभव सांगितला आहे.
‘अॅस्पिरंट्स, ‘पिचर्स’ (Pitchers) यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम करीत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे नवीन कस्तुरीया (Naveen Kasturia). ‘अॅस्पिरंट्स’ ‘या वेब सीरिजमध्ये त्यानं साकारलेल्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. अलीकडेच नवीन अभिनेत्री मौनी रॉयसह ‘सलाकार’ या वेब सीरिजमध्ये झळकला. ‘जिओ हॉटस्टार’वर ही वेब सीरिज प्रदर्शित झालीये. अशातच अभिनेत्यानं ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील कलाकारांसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
नवीन कस्तुरीयाची वरिष्ठ कलाकारांबद्दल प्रतिक्रिया
नवीन म्हणाला, “काही वरिष्ठ कलाकार सेटवरील क्रू मेंबरबरोबर चुकीचं वागतात. ते त्यांचा आदर करीत नाहीत. मला असं वाटतं की, हे फक्त भारतातच होतं.” पुढे तो म्हणाला, “मुंबईतील काही सोसायट्यांमध्ये गेटजवळ असलेले वॉचमन अनेकदा येणाऱ्या-जाणाऱ्याला उभे राहून सलाम करतात. मला ही गोष्ट कधी कळलीच नाही. मला तर असं वाटतं की, जर त्या वॉचमननं कधी उभं राहून तिथे येणाऱ्या-जाणाऱ्यांपैकी कोणाला सलाम केला नसेल, तर त्यावर कोणीतरी आक्षेप घेतला असणार. काही लोकांना वाटतं की, जर कोणीतरी त्यांच्यापेक्षा कमी पैसे कमावत असतील, तर त्यांना जणू अशा लोकांबरोबर चुकीचं वर्तन करण्याची परवानगीच मिळाली आहे.”
नवीन पुढे सेटवरील अनुभव सांगत म्हणाला, “चित्रपटाच्या सेटवर अनेक लोक एकत्र काम करीत असतात आणि दुर्दैवानं सेटवरील क्रू मेंबर्सना वाईट वागणूक दिली जाते. पण, तेच लोक जेव्हा परदेशात शूटिंगच्या निमित्तानं जातात तेव्हा त्यांना कळतं की, भारताबाहेर ते नवोदित कलाकारांना किंवा कोणालाही अशी वागणूक देऊ शकत नाहीत.”
नवीन पुढे म्हणाला, “मला असं वाटतं की, कोणालाही कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्याचा किंवा त्यांच्याशी चुकीचं वर्तन करण्याचा अधिकार नाहीये. पण, दुर्दैवानं भारतातील अनेक चित्रपटांच्या सेटवर असं घडतं. प्रत्येकाला आदरानं वागवलं गेलं पाहिजे.”