Best Suspense Thriller Film: या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर काय पाहावं, असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम चित्रपट उपलब्ध आहे. हा चित्रपट याच वर्षी आला होता. थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर या चित्रपटाचा प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाची कथा विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ पेक्षाही दमदार आहे व त्याचा क्लायमॅक्स अजय देवगणच्या ‘दृश्यम’पेक्षा जबरदस्त आहे.
२ तास २६ मिनिटांचा हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाची कथा दमदार आहे. सुरुवातीलाच एक खून होतो. यानंतर कथेत खूप ट्विस्ट येतात. या चित्रपटाचं नाव ‘प्रवीणकुडू शप्पू’ (Pravinkoodu Shappu on OTT) असं आहे. हा एक मल्याळम ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. यात जबरदस्त सस्पेन्स व थ्रिल आहे. या चित्रपटात बासिल जोसेफ, शौबिन शाहिर, चांदिनी श्रीधरन, चेम्बन विनोज जोसे व शिवाजीत या कलाकारांनी काम केलं आहे.
‘प्रवीणकुडू शप्पू’ हा चित्रपट १६ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एका खुनाभोवती फिरतो. हत्येचं गूढ उकलण्यासाठी तपास सुरू असताना एक मोठा खुलासा होतो. या चित्रपटात ज्याचा खून होतो त्या बाबू (शिवाजीत) नावाच्या व्यक्तीचे दारूचे दुकान असते.
चित्रपटाची कथा
बाबू त्या भागातील बाहुबली असतो, त्याच्याशी भांडायची हिंमत कुणाचीच नसते. अचानक एकदिवशी तो त्याच्याच दुकानात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळतो. त्या दुकानात दुसऱ्या खोलीत इतर काही लोक असतात जे जुगार खेळत असतात. बाबूचा खून झालाय, हे समजल्यावर पोलिसांना कळवलं जातं. पोलीस घटनास्थळी येतात आणि मग प्रकरणाचा तपास सुरू होतो. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी एसआय संतोषला (बासिल जोसेफ) सोपवली जाते.
या चित्रपटाची कथा जसजशी पुढे सरकते, तशीच प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढत जाते, त्यानंतर अनेक मोठे खुलासे होतात. बाबूच्या हत्येसंदर्भात एसआय संतोषला अनेक लोकांवर संशय असतो, परंतु त्याला कोणताही पुरावा सापडत नाही.
दमदार क्लायमॅक्स
‘प्रवीणकुडू शप्पू’च्या क्लायमॅक्समध्ये असा खुलासा होतो, ज्याच्याबद्दल कोणीही विचार करू शकत नाही. तुम्हाला जर सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील, तर तुम्ही घरबसल्या हा चित्रपट ओटीटीवर नक्की पाहा. हा चित्रपट सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या चित्रपटाचा रन टाइम २ तास २६ मिनिटं आहे.
सस्पेन्स-थ्रिलर ‘प्रवीणकुडू शप्पू’ हा चित्रपट श्रीराज श्रीनिवासनने लिहिला व दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.६ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही या वीकेंडला हा चित्रपट पाहू शकता.