तुम्ही जर अॅक्शन व सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहून कंटाळले असाल तर एक प्रेमळ, नात्यातील गुंतागुंतीवर भाष्य करणारा सिनेमा तुम्ही ओटीटीवर पाहू शकतात. यात मारहाण नाही, रक्तपात नाही, फक्त प्रेम, आपुलकी, नातेसंबंध, कुटुंब, जबाबदाऱ्या या गोष्टी दाखण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘मेट्रो इन दिनों’.
ओटीटीवर सध्या ‘मेट्रो इन दिनों’ हा २०२५ मधील म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपट प्रचंड गाजत आहे. या चित्रपटात अॅक्शन नाही, मारामारी नाही – पण तरीही २ तास ४० मिनिटांची ही कहाणी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
‘मेट्रो इन दिनों’ २०२५ मध्ये रिलीज झालेला म्युझिकल रोमँटिक चित्रपट आहे. यात अली फजल, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा आणि सारा अली खान यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शन अनुराग बसु यांनी केले आहे. त्यांनीच पटकथा आणि संवादही लिहिले आहेत. निर्मातेही तेच आहेत.
चार जोडप्यांची गोष्ट
या चित्रपटात चार जोडप्यांच्या नात्यांमधील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. ही चारही जोडपी वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांशी कनेक्टेड आहेत. कोणाचं लग्नानंतरचं आयुष्य आनंदी नाही, तर कोणीतरी लग्नाचा निर्णय घ्यावा की नाही या गोंधळात आहे. कुणाच्या नात्यात करिअरमुळे अडचणी येतायत, तर कुणी आपल्या जोडीदाराबरोबर तडजोड करून राहतंय. प्रेम, नाती आणि त्यामागचे भावनिक पैलू हलक्या-फुलक्या कॉमेडीसह अतिशय सुंदर पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
‘मेट्रो इन दिनों’ मध्ये, नीना गुप्ता यांनी शिवानीची भूमिका केली आहे. ती कॉलेजमधील प्रियकर परिमलला (अनुपम खेर) विसरून संजीवशी (सास्वता चॅटर्जी) लग्न करते. ४० वर्षांचा तिचा संसार असतो, पण अचानक ती परिमलला पुन्हा भेटते आणि तिचे जुने दिवस पुन्हा नव्याने जगते.
‘मेट्रो इन दिनों’ २९ ऑगस्ट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. सध्या टॉप ट्रेंडिंग सिनेमांच्या यादीत हा पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ‘सैयारा’, दुसऱ्या क्रमांकावर ‘इन्स्पेक्टर झेंडे’, तिसऱ्या क्रमांकावर ‘मटेरियलिस्ट्स’ आणि चौथ्या क्रमांकावर विजय देवराकोंडाचा ‘किंगडम’ आहेत.
‘मेट्रो इन दिनों’ ने भारतात ६४.७ कोटींचं कलेक्शन केलं आहे. जगभरात या चित्रपटाने ६८.२९ कोटींचा व्यवसाय केलं. IMDb वर या चित्रपटाला १० पैकी ६.८ रेटिंग मिळाले आहे. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर नेटफ्लिक्सवर नक्की बघा. कारण नात्यांची ही साधी पण हृदयाला भिडणारी कहाणी प्रेक्षकां पसंतीस उतरली आहे.