ओटीटी प्लॅटफॉर्म्स आल्यावर चित्रपट पाहण्यासाठी टीव्ही व थिएटरच्या पलिकडे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. ओटीटीमुळे अनेक छोटे चित्रपटही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात आणि चांगली कमाई करतात. दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवर बेतलेले प्रादेशिक चित्रपटही चर्चेचा विषय ठरतात. असाच एक दाक्षिणात्य चित्रपट आहे, ज्यात कोणतेही मोठे स्टार नाही. पण चित्रपटाचा विषय व कलाकारांचं काम इतकं दमदार आहे की लोक त्याचं कौतुक करत आहेत.

या चित्रपटाचे नाव ‘डियर’ आहे. या चित्रपटाचा विषय घोरणे हा आहे, यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. खरंतर ही एक छोटीशी बाब आहे, पण चित्रपटात ती उत्तम प्रकारे दाखवण्यात आली आहे. ही एक अशी समस्या आहे जी प्रत्येकाला प्रत्यक्ष आयुष्य जगताना भेडसावत असते. तमिळ अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक जी.व्ही. प्रकाश कुमार आणि ऐश्वर्या राजेश या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह देखील हा चित्रपट पाहू शकता.

चित्रपटाची कथा

‘डियर’ चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, अर्जुन (जी.व्ही. प्रकाश) हा एक न्यूज रीडर आहे. त्याला कमी झोप येते आणि थोड्याशा आवाजाने तो जागा होतो. झोप न लागणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या आहे. दुसरीकडे, दीपिका (ऐश्वर्या राजेश) ही एक अतिशय सुंदर मुलगी आहे. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि नंतर लग्न करतात.

अर्जुन आणि दीपिकाच्या वैवाहिक जीवनात सगळं सुरळीत चाललं असतं, पण एका छोट्याशा गोष्टीमुळे त्यांच्यात भांडणं होतात. दीपिकाला घोरण्याची समस्या असते आणि अर्जुनला रात्री झोप न येण्याची समस्या असते. यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतात आणि दुरावा येतो. ही समस्या सोडवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि घरगुती उपाय करूनही कोणताही फायदा होत नाही. हा चित्रपट पाहताना तुम्हाला बरेचदा हसायला येईल.

अर्जुन व दीपिकाचे कुटुंबीय आणि मित्रांचे सल्ले देखील कथेला एका मजेदार पद्धतीने पुढे घेऊन जातात. शेवटी दोघांच्याही वेगवेगळ्या सवयींमुळे होणारा त्रास पाहता नाते टिकतं का? की नातं तुटतं? हे क्लायमॅक्समध्ये एका मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.

नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे सिनेमा

आनंद रविचंद्रन दिग्दर्शित ‘डियर’ मध्ये जी.व्ही. प्रकाश, ऐश्वर्या राजेश, रोहिणी, काली वेंकट, इलावरासू आणि थलायवासल विजय यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट ११ एप्रिल २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये उपलब्ध आहे. २ तास १४ मिनिटांच्या या चित्रपटाला IMDb वर ५.२/१० रेटिंग मिळाले आहे.