मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. मग त्याला कलाकारही अपवाद ठरत नाही. कारण- या स्वप्ननगरीत स्वत:चं घर असणं ही सोपी गोष्ट नाही. देशभरातील विविध ठिकाणांहून लोक येथे कामानिमित्त येतात आणि येथलेच रहिवासी होऊन जातात. त्यामुळे या शहरात घर असावं, असं त्यांचं स्वप्न असतं. त्यात मुंबई हे बॉलीवूडचं मुख्य केंद्र असल्यानं अनेक कलाकार कामानिमित्त या शहरात येत असतात. त्यामुळे कलाकार म्हणून कामं केल्यानंतर स्थिरता आल्यावर मुंबईत घर असावं, अशी त्यांची इच्छा असते. अशातच एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यानं नुकतंच मुंबईत स्वत:चं मोठं घर खरेदी केलं आहे.

‘महाराज’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेला अभिनेता जयदीप अहलावतनं नुकतंच मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे. जयदीप व त्याची पत्नी ज्योती हुडा यांनी मुंबईच्या अंधेरी परिसरात तब्बल १० कोटींचं घर खरेदी केलं आहे. मुंबई शहरातील अंधेरी हा सुख-सुविधांनी युक्त असा परिसर मानला जातो. याच परिसरात अनेक टीव्ही मालिका, चित्रपटांचं शूटिंग होत असतं. त्याशिवाय या परिसरात अनेक बड्या निर्मात्यांची कार्यालयंसुद्धा आहेत. तर अंधेरीमध्ये मराठीसह बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार राहत आहेत.

जयदीप अहलावतनं या परिसरात त्याच्या पत्नीसह नवीन घर खरेदी केल्यानं याबाबत चर्चा होताना दिसत आहे. जयदीप अहलावत हा मूळचा हरियाणाचा असून, कामानिमित्त तो मुंबईत स्थायिक झाला आहे. त्यानं आजवर अनेक प्रसिद्ध कलाकृतींमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या आमिर खानच्या मुलाच्या बॉलीवूडमधील पदार्पणातील चित्रपट ‘महाराज’मध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. त्याच्या या भूमिकेनं तो बराच चर्चेत आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जयदीप अहलावतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आजवर ‘खट्टा-मिठ्ठा’, ‘आक्रोश’, ‘रॉक्साटर’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रईस’, ‘राझी’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘महाराज’ यांसारख्या अनेक कलाकृतींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. येत्या काळात तो ‘इक्किस’ चित्रपटातून झळकणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तो ‘ज्वेल थीफ’, ‘पाताल लोक -सीझन २’ यामधून झळकला होता.