‘पंचायत ४’ मध्ये सर्वाधिक चर्चा बिनोद व विधायक जी यांची झाली. दोघांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या सीरिजमधील इतर पात्रांबरोबरच रिंकी हे पात्र साकारणाऱ्या सान्विकाचंही खूप कौतुक झालं. या सीझनमध्ये सचिव जी व रिंकी यांच्यातील प्रेम फुलताना दाखवण्यात आलं. या सीरिजमध्ये दोघांचा एक किसिंग सीन ठेवण्यात आला होता, पण सान्विकाने त्यासाठी नकार दिला.

जस्ट टू फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत, सान्विकाने तिचा सह-कलाकार जितेंद्र कुमारबरोबर किसिंग सीन करण्यास नकार दिल्याचं सांगितलं. तिने हा निर्णय दोन गोष्टींच्या आधारे घेतला होता. पहिला म्हणजे स्क्रीनवर किसिंग सीन करताना तिचा कंफर्ट व दुसरा म्हणजे ही सीरिजचे प्रेक्षक. ही सीरिज लोक कुटुंबाबरोबर बसून पाहतात, त्यामुळे किसिंग सीनला नकार देण्यामागचं तेही एक कारण होतं, असं ती म्हणाली.

सान्विका म्हणाली, “सुरुवातीला, जेव्हा सीरिजची कथा सांगण्यात आली तेव्हा याबद्दल कोणीच काही बोललं नव्हतं. पण नंतर दिग्दर्शक अक्षत (विजयवर्गीय) माझ्याशी बोलला. तो म्हणाला की या सीझनमध्ये आम्ही सचिव जी आणि रिंकी यांचा एक किसिंग सीन समाविष्ट केला आहे. पूर्वी, तो सीन वेगळा होता. ते कारमध्ये एकत्र असतात आणि एकमेकांना किस करतात.”

“मी यावर विचार करण्यासाठी दोन दिवस मागितले. मला काळजी वाटत होती, कारण पंचायतचे प्रेक्षक सर्व प्रकारचे आहेत. बरीच कुटुंबे ही सीरिज पाहतात आणि मीही कंफर्टेबल नव्हते, म्हणून मी त्यावेळी हा सीन करण्यास नकार दिला. आम्ही शूटिंग करत असताना त्यांनी तो सीन काढून टाकला आणि त्याऐवजी पाण्याच्या टाकीचा सीन घेतला,” असं सान्विका म्हणाली.

सान्विकाची संमती महत्त्वाची – जितेंद्र कुमार

सान्विकाच्या वक्तव्यावर जितेंद्र कुमारने स्पष्टीकरण दिलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र म्हणाला, “मला वाटते की सान्विकाच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. कारण जेव्हा हा सीन करायचा असं ठरवलं तेव्हा मी निर्मात्यांना सांगितलं की आधी तिला विचाराला. तो सीन करायला तिची संमती असणं सर्वात महत्त्वाचं आहे. आम्हाला तो सीन विचित्र पण मजेदार बनवायचा होता – ते किस करायला जातील आणि लाईट बंद होईल, पण शेवटी तो वेगळ्या पद्धतीने चित्रित करण्यात आला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी आयुष्मान खुरानाला किस केलंय- जितेंद्र कुमार

जितेंद्रने स्क्रीनवर इंटिमेट सीन करण्यात तो कंफर्टेबल असतो की नाही, त्याबाबत सांगितलं. “शुभ मंगल ज्यादा सावधानमध्ये मी आयुष्मान खुरानाला किस केलं होतं. मी याआधी स्क्रीनवर अभिनेत्रींबरोबर किसिंग सीन दिले आहेत. एक अभिनेता म्हणून, मी त्याबद्दल काहीच बंधनं घातली नाही. मग तो किसिंग सीन असो किंवा इतर कोणताही सीन. तो कथेशी संबंधित असायला हवा. कथेत त्या सीनमुळे मजा यायला हवी, प्रेक्षक त्या दृश्याशी कनेक्ट व्हायला हवे,” असं जितेंद्र म्हणाला.