काही साधे चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकून जातात. कलाकारांचा उत्तम अभिनय, दमदार, खऱ्या वाटणाऱ्या कथा यामुळे असे चित्रपट हिट होतात. असाच एक चित्रपट महिनाभरापूर्वी थिएटरला आला आणि आता ओटीटीवर आला आहे. चित्रपटाची साधी कथा, कलाकारांचा अप्रतिम अभिनय व कमाल सिनेमॅटोग्राफी यामुळे या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ९.१ रेटिंग मिळाले आहे. हा यंदाजा टॉप रेटिंग असलेला सिनेमा आहे.

या चित्रपटाचे नाव ‘कन्याकुमारी’ (Kanya Kumari) आहे. हा तेलुगू रोमँटिक ड्रामा आहे. दमदार कथा आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे कन्याकुमारीला आयएमडीबीवर ९.१ रेटिंग मिळाले आहे. कन्याकुमारी गेल्या महिन्यात म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता अवघ्या महिनाभरात तो ओटीटीवरही आला आहे.

काय आहे ‘कन्याकुमारी’ची कथा?

कन्याकुमारीची गोष्ट आहे एका गावात राहणाऱ्या शेतकरी तिरुपती (श्रीचरण राचाकोंडा) आणि महत्त्वाकांक्षी टेक-प्रेमी मुलगी कन्याकुमारी (गीथ सैनी) यांच्या प्रेमकथेची. तिरुपती लहानपणापासून शेतीत रमलेला असतो, तर कन्याकुमारीचं स्वप्न सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं असतं. पण आर्थिक अडचणींमुळे तिला कपड्यांच्या दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करावं लागतं.

कन्याकुमारी हा चित्रपट केवळ प्रेमकथा नसून तो स्वप्नं, संघर्ष आणि सामाजिक अडथळे या पैलूंवर प्रकाश टाकतो. तिरुपतीचं प्रेम आणि कन्याकुमारीची मोठी स्वप्नं त्यांना एकमेकांच्या जवळ आणतात. दोघांची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगवेगळी असली तरी ते समोर येणाऱ्या आव्हानांना एकत्र सामोरे जातात, हेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

‘कन्याकुमारी’ ओटीटीवर कुठे पाहायचा?

Kanya Kumari on Prime Video: कन्या कुमारी या चित्रपटाचं दिग्दर्शन स्रुजन अट्टाडा यांनी केलं आहे. त्यांनी ही कथा खूपच संवेदनशीलपणे आणि वास्तववादी मांडली आहे. ‘कन्याकुमारी’ हा चित्रपट आता प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. जर तुम्ही अजूनही टॉप रेटेड सिनेमा कन्याकुमारी पाहिला नसेल तर नक्की पाहा.