ओटीटी प्लॅटफॉर्म आणि त्यावर येणाऱ्या गुन्हेगारीविश्वाशी निगडीत सीरिज आणि चित्रपट ही सध्याच्या प्रेक्षकांची पसंती आहे. या विषयाशी निगडीत कोणत्याही भाषेतील कलाकृती असो, भारतीय प्रेक्षक ती सहसा चुकवत नाही. अशीच एका भारतातील सिरियल किलर्सच्या कृत्यांवर प्रकाश टाकणारी एक डॉक्युमेंट्री सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या सीरिजचं नाव आहे ‘इंडियन प्रेडटोर’.

या सीरिज अंतर्गत आत्तापर्यंत २ मनोरुग्ण अशा सीरियल किलरची गोष्ट उलगडून दाखवली आहे. या दोनही सीझनला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आता या सीरिजचा पुढील भाग हा अशाच एका भयानक हत्याकांडावर बेतलेला असणार आहे. ‘मर्डर इन अ कोर्टरूम’ असं या पुढील सीझनला नाव दिलं असून यामधून एका बलात्कारी गुन्हेगाराच्या दुष्कृत्याचा पर्दाफाश होणार आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लूकवरुन होणाऱ्या टीकेला ओम राऊत यांचं चोख उत्तर; म्हणाले “आमचा रावण हा..”

या तिसऱ्या भागात महाराष्ट्रातील कुख्यात गुन्हेगार अक्कू यादव याची गोष्ट आपल्याला बघायला मिळणर आहे. महाराष्ट्रातील कस्तुरबा नगरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या अक्कू यादवसाठी चोरी, खून या खूप किरकोळ गोष्टी होत्या. त्याच्यावर ४० महिलांवर बलात्कार करून त्यांचा वर्षंभर छळ केल्याचा आरोप होता. अक्कूबद्दल प्रत्येक महिलेच्या मनात एवढी भीती बसली होती की कुणीच त्याच्याविरोधात तक्रार करायला तयार होत नव्हतं.

याच प्रकरणात जिल्हा न्यायलयात त्याच्यावर लागलेल्या गुन्ह्याची सुनावणी सुरू असताना महिलांच्या एका मोठ्या घोळक्याने कोर्टात प्रवेश केला. त्या महिलांनी स्वतःचा चेहेरा झाकला होता, संपूर्ण कोर्टरूममध्ये तिखटाची पावडर उधळून त्यांनी अक्कू यादववर हल्ला केला आणि त्याला यमसदनी धाडला. या सगळ्या गदारोळात पोलिसही काहीच करू शकले नाहीत. त्या महिला कोण होत्या याचा निकाल कधीच लागला नाही, पण कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवून कित्येक महिलांच्या आयुष्याची राखरंगोळी करणाऱ्या अक्कू यादवचा मात्र चांगलाच निकाल लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच विषयावर मध्यंतरी अमोल पालेकर आणि रिंकू राजगुरू अभिनीत ‘२०० हल्ला हो’ हा चित्रपटही झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला होता. आता याच विषयावर बेतलेली एक सीरिज २८ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स आपल्यासाठी घेऊन येत आहे.