Squid Game Season 3 Teaser Out: साडे तीन वर्षांपूर्वी ‘नेटफ्लिक्स’वर कोरियन वेब सीरिज ‘स्क्विड गेम’चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं होतं. तसंच या थ्रिलर सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर तीन वर्षांनी ‘स्क्विड गेम’ सीरिजचा दुसरा भाग गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या भागालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता अखेरचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच ‘स्क्विड गेम ३’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘नेटफ्लिक्स’ने ‘स्क्विड गेम ३’ सीरिजचा टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरमध्ये सेओंग गि-हून (ली जंग-जे) आणि फ्रंट मॅन (ली ब्युंग-हुन) यांच्यातील लढाई आता अजूनच थरारक आणि रोमांचक असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्क्विड गेम २’ मध्ये सेओंग गि-हून म्हणजे खेळाडू नंबर ४५६ हा थरारक खेळ कायमचा संपवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. यासाठी तो पुन्हा एकदा रेड आणि ग्रीन लाईट अशा अनेक नव्या आव्हानांना सामोरे जाताना दिसला. यावेळी स्वतः फ्रंट मॅन (गोंग यू) खेळात उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सेओंग गि-हूनचा हा खेळ संपवण्याचा प्रयत्न फ्रंट मॅन सतत हाणून पाडताना दिसला. अखेरच्या टप्प्यात सेओंग गि-हूनला फ्रंट मॅनने ताब्यात घेतल्यामुळे पुढे काय होणार? हा थरारक खेळ संपुष्टात आणण्याचा गि-हूनच्या प्रयत्नाला यश मिळत की नाही? हे ‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘स्क्विड गेम ३’च्या टीझरमध्ये गि-हून कठीण परिस्थितीत अडकल्याचं दिसत आहे. जवळचा मित्र जंग-बे ( खेळाडू नंबर ३९० )चा मृत्यू आणि फ्रंट मॅनच्या विश्वासघातामुळे गि-हून हतबल झाला आहे. तसंच टीझरमध्ये एक गमबॉल मशीन पाहायला मिळत आहे, जी सीरिजमधील खतरनाक खेळांची झलक दाखवत आहे. गि-हूनला आता आणखी क्रूर खेळ खेळावे लागणार आहेत, जिथे प्रत्येक पावलावर त्याचा जीव धोक्यात आहे. ‘स्क्विड गेम ३’मधील गि-हूनचे पात्र पूर्वीपेक्षा वेगळे असणार आहे.

सीरिजचे निर्माते ह्वांग डोंग-ह्युक यांनी सांगितलं की, गि-हूनने सर्व काही गमावलं आहे आणि आता त्याला हार मानायची की लढा पुढे सुरू ठेवायचा याची निवड करायची आहे. सोशल मीडियावर ‘स्क्विड गेम ३’च्या टीझरला खूप पसंती मिळत आहे आणि लोक कमेंट बॉक्समध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. २७ जून २०२५ रोजी ‘स्क्विड गेम ३’ प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्क्विड गेम ३’ सीरिजमध्ये जंग-जे, ली ब्युंग-हून, वी हा-जून, पार्क ग्यू-यंग, यिम सी-वान यांसारखे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. नव्या पात्रांमध्ये कांग नो-युलची कथा महत्त्वाची असणार आहे, जी उत्तर कोरियाची एक डिफेक्टर आहे आणि गेममध्ये शूटरची भूमिका साकारत आहे.