OTT Release This Week : ओटीटीवर काय नवीन पाहायला मिळणार, कोणते सिनेमे, वेब सीरिज प्रदर्शित होणार याबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता असते. विशेष करून ज्यांना घराच्या बाहेर न पडता घरबसल्याच काहीतरी भन्नाट पाहायचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात या आठवड्यात ओटीटीवर कोणते चित्रपट पाहता येणार आहेत…

सैयारा

मोहित सुरी दिग्दर्शित १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला चित्रपटप्रेमींकडून तुफान प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. पण, चित्रपट पाहण्याची आवड जरी असली तरी वेळ नसल्याने काहींना हा चित्रपट पाहता आला नसेल तर आता त्यांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट आज १२ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाची कथा फिल्म म्युझिशियन क्रिश कपूर आणि लेखिका वाणी यांच्या अवती भोवती फिरते, जे एकमेकांच्या प्रेमात असतात पण त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ येतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृहात लोकांनी बरीचगर्दी केली होती.


कुली

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा कुली चित्रपटही या विकेंडला ओटीटीवर पाहता येणार आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित आणि लिखित हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे, जो या आठवड्यात प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालेला. रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आता त्यांच्या चाहत्यांना ओटीटीवरही पाहता येणार आहे.

गर्लफ्रेंड

रॉबिन राइट आणि ओलिविया कुक अभिनीत ‘द गर्लफ्रेंड’ ही ड्रामा सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रसारित होत आहे. ‘द गर्लफ्रेंड’ लॉराची कथा आहे. लॉरा एक अशी स्त्री, जिच्याकडे सगळं काही असतं. उत्तम करिअर, एक चांगला नवरा आणि एक मुलगा. पण, तिचा मुलगा डॅनियल जेव्हा त्याची गर्लफ्रेंड चेरीला घरी आणतो तेव्हा लॉराच्या आयुष्यात एका मागोमाग एक अडचणी निर्माण व्हायला लागतात. लॉराच्या लक्षात येतं की चेरी तिच्यापासून काहीतरी लपवत असते.