Panchayat Fame Actor Shares His Health Update : ‘पंचायत’फेम अभिनेत्याला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं त्याच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली आहे.
पंचायतमध्ये गणेश ही भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ खानला प्रकृती बिघडल्यानं रुग्णाल्यात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु, आता अभिनेत्यानं त्या कारणामुळे नव्हे, तर वेगळ्या कारणामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं गेल्याचं सांगितलं आहे. ‘ई टाइम्स’शी संवाद साधताना आसिफ खान म्हणाला, “मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता, तर गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (gastroesophageal reflux disease) हा आजार झाला होता.
अभिनेता त्याबाबत पुढे म्हणाला, “या आजाराची लक्षणं काहीशी तशीच असल्यानं तसं वाटलं होतं; पण आता मी पूर्णपणे बरा आहे”. त्यासह आसिफ खाननं या मुलाखतीमध्ये डॉक्टरांनी त्याला दिलेल्या सल्ल्याबद्दलही सांगितलं आहे. डॉक्टरांनी आसिफला प्रकृतीकडे अधिक लक्ष देत आहारामध्ये काही बदल करायला सांगितले आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल आसिफ म्हणाला, “डॉक्टरांनी मला दाल बाटी, मांसाहार हे खाऊ नको असं सांगितलं आहे. त्यांनी व्यायाम करायलाही सांगितलं आहे. मला वाटत नाही की, याचा माझ्या कामावर काही परिणाम होईल. अशा गोष्टी प्रत्येकाबरोबर घडत असतात; पण लोक त्यातून बाहेर येत पुढे जातात”.
माध्यामांच्या माहितीनुसार या आठवड्यात आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर अभिनेत्यानं स्वत: सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार तो यावेळी म्हणालेला, “आयुष्य खूप छोटं आहे. एकही दिवस वाया जाऊ देऊ नका. एका क्षणात सगळं बदलू शकतो. तुमच्याकडे जे आहे, त्यासाठी कृतज्ञ राहा”.
दरम्यान, आसिफ खाननं ‘पंचायत’ या सीरिजमध्ये गणेश ही भूमिका साकारली होती. ‘पंचायत’ ही ओटीटीवरील एक गाजलेली सीरिज आहे. नुकताच या सीरिजचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, चंदन रॉय, सानविका, अशोक पाठक, दुर्गेश कुमार यांसारखे कलाकार पाहायला मिळत आहेत. आसिफनं त्याव्यतिरिक्त ‘पाताल लोक सीझन १’मध्ये कबीर हे पात्र साकारलं होतं. त्यानं ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’, ‘रेड्डी’, ‘अग्निपथ’, ‘काकुडा’, ‘द भूतनी’ यांसारख्या कलाकृतींमध्येही काम केलं आहे.