सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचं झालं आहे. दररोजच्या मनोरंजनासाठी प्रत्येकजण ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतं आहे. कोणी मालिका बघण्यासाठी, तर कोणी वेब सीरिज, चित्रपट बघण्यासाठी ओटीटीचा वापर करतात. आता प्रत्येकाकडे ओटीटीचं सब्सक्रिप्शन असतं. ‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’, ‘जी ५’, ‘जिओ हॉटस्टार’, ‘सोनी लिव्ही’ असे बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत, ज्याचा वापर जगभरातील लोक दैनंदिन जीवनात करत आहेत. मनोरंजनासाठी ओटीटी हे एक नवं माध्यम आहे. पण तुम्हाला ओटीटीवरील भारताची पहिली वेबसीरिज माहितीये का? आज आपण भारताच्या या पहिल्या वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात…

‘पंचायत’, ‘मिर्झापूर’ यांसारख्या वेब सीरिजची आज सर्वत्र चर्चा होतं असते. या सीरिज फक्त देशात नाहीतर विदेशातही तितक्याच आवडीने पाहिल्या जातात. पण, भारताची पहिली वेब सीरिज कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली नव्हती, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.

भारताच्या पहिल्या वेब सीरिजचं नाव ‘पर्मनंट रूममेट्स’ ( Permanent Roommates ) आहे. भारताची ही पहिली वेब सीरिज युट्यूबवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये सुमित व्यास ( Sumeet Vyas ), निधी सिंह ( Nidhi Singh )सह अनेक कलाकार मंडळी झळकले होते. ‘पर्मनंट रूममेट्स’ या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०१४मध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजचा पहिला सीझन सुपरहिट झाल्यानंतर दुसरा सीझन २०१६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. ‘पर्मनंट रूममेट्स’चा तिसरा सीझन ७ वर्षांनी २०२३मध्ये स्ट्रीम झाला होता. या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आजही लोक युट्यूबवर आवडीने ‘पर्मनंट रूममेट्स’ सीरिज पाहतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Permanent Roommates Poster ( Photo Credit - IMDb )
Permanent Roommates Poster ( Photo Credit – IMDb )

‘पर्मनंट रूममेट्स’ सीरिजची कथा काय आहे?

‘पर्मनंट रूममेट्स’ वेब सीरिजमध्ये एका कपलचं लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप दाखवण्यात आलं आहे. यामध्ये सुमित व्यासने मुकेशची भूमिका साकारली आहे. तर त्याची गर्लफ्रेंड तान्याच्या भूमिकेत निधी झळकली आहे. मुकेश तान्याला भेटण्यासाठी भारतात येतो आणि मग दोघं लिव्ह इनमध्ये राहतात. त्यानंतर दोघं अनेक आव्हानांना सामोरे जाताना दाखवण्यात आलं आहे.