बॉक्स ऑफिसवर दरवर्षी शेकडो चित्रपट रिलीज होतात. त्यापैकी काही चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतात, काही कधी रिलीज झाले हेही कळत नाही; पण काही असे लहान बजेटचे चित्रपट असतात ते आपल्या कथेमुळे, कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. असाच एक चित्रपट आहे ‘3 बीएचके’.
थिएटरमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर ‘3 बीएचके’ ने ओटीटीवरही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. हा फॅमिली ड्रामा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा २१ वर्षांचा प्रवास दाखवतो. या कुटुंबाचं स्वप्न स्वतःचं हक्काचं ३ बीएचके घर खरेदी करणं आहे. हा चित्रपट पाहताना काही ठिकाणी तुम्हाला हसू येईल, पण त्याचा क्लायमॅक्स पाहून तुम्ही भावुक व्हाल.
चित्रपटाची कथा
अरविंद सच्चिदानंदम यांच्या ‘3 बीएचके वीडू’ या शॉर्ट स्टोरीवर आधारित या चित्रपटात शरत कुमार, सिद्धार्थ, देवयानी आणि मीठा रघुनाथ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २००६ मध्ये वासुदेवन, त्यांची पत्नी शांती आणि त्यांची दोन मुलं प्रभु आणि आरती भाड्याच्या घरात राहायला जातात, तिथून ही कथा सुरू होते. हे एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आहे. त्यांना घराचं भाडं, पाण्याची कमतरता आणि वीज कपात यासारख्या समस्या भेडसावत असतात.
वासुदेवनला वाटतं की जे स्वप्न तो पूर्ण करू शकला नाही, ते त्याच्या मुलाने पूर्ण करावे. त्यामुळे तो भविष्यात सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर करिअर मिळावं, यासाठी प्रभूला मेकॅनिकल इंजिनिअरिंगऐवजी आयटीचा अभ्यास करण्यास भाग पाडतो. प्रभू त्याच्या वडिलांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या इच्छांमध्ये अडकतो. त्याच वेळी, आरती कुटुंबाची परिस्थिती समजून घेत, तिच्या लहान स्वप्नांचा त्याग करते आणि कुटुंबाला आधार देते.
वासुदेवनचे कुटुंब पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्यांच्याकडे फक्त ७.५ लाख रुपये असतात, तर घराची किंमत १५ लाख रुपये असते. कसेबसे ते १५ लाख रुपये जमा करतात, तेव्हा फ्लॅटची किंमत २५ लाख रुपये होते. याचदरम्यान, आरतीचं लग्नाचं वय झालं असतं, त्यामुळे ते पैसे आरतीच्या लग्नासाठी खर्च करावे लागतात. यातच वासुदेवनची नोकरी जाते, तर प्रभू कुटुंबाला न सांगता लपून काम करू लागतो.
कुठे पाहायचा 3 बीएचके सिनेमा?
एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला त्यांचे छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, हे या चित्रपटात पाहायला मिळतं. ‘3 बीएचके’ हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या २ तास २१ मिनिटांच्या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.४ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही तो अमेझॉन प्राइम व्हिडीओवर हिंदीसह दक्षिण भारतीय भाषांमध्ये पाहू शकता.
