Raid 2 OTT Release: बॉलीवूड अभिनेता अजय देवगण व रितेश देशमुख यांचा ‘रेड २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या सिनेमाच्या कथेने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आणि २०० कोटींचा टप्पा ओलांडला. थिएटरनंतर यशस्वी ठरलेला ‘रेड २’ आता डिजिटल रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट तुम्ही घर बसल्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता ते जाणून घ्या.
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसला. त्याने आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण प्रेक्षकांना हा चित्रपट खूप भावला.
कुठे पाहता येणार ‘रेड २?’
‘रेड २’ ने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मोजक्याच चित्रपटांपैकी एक आहे. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर तो घरी बसून ओटीटीवर पाहू शकता. कारण आज २६ जून रोजी, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी २५ जूनला पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली. निर्मात्यांनी बुधवारी रात्री त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ‘रेड २’ च्या ओटीटी रिलीजची घोषणा केली आणि लिहिलं, “ट्रान्सफर कन्फर्म, आयआरएस अमय पटनायकच्या छाप्यासाठी तयार आहात? रेड २ पाहा, आता नेटफ्लिक्सवर!”
‘रेड 2’ ची कथा
‘रेड २’ मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणने प्रामाणिक आयकर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. छापेमारीदरम्यान लाच मागितल्याचा खोटा आरोप झाल्यानंतर अमय पटनायकची भोज पोलीस ठाण्यात बदली होते. जेव्हा अमय रितेश देशमुखने साकारलेल्या दादा भाईंना भेटतो, तेव्हा चित्रपटात एक मनोरंजक ट्विस्ट येतो. दादा भाई एक स्थानिक राजकारणी असतो. पण अमयला त्याच्यावर संशय येतो आणि तो त्याच्या घरावर आणि ऑफिसवर छापा टाकण्याचा निर्णय घेतो. यानंतर, कथेत अनेक ट्विस्ट येतात. हे ट्विस्ट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील.
‘रेड 2’चे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन
४८ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या ‘रेड 2’ ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाने भारतात १७८.८ कोटींचे कलेक्शन केले. तर जगभरात २४३.०६ कोटी रुपयांची कमाई केली.