Saiyaara OTT Release Update : मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अहान पांडे व अनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा थिएटर्समध्ये जलवा पाहायला मिळत आहे. १८ दिवसांपासून बॉक्स ऑफिस गाजवत असलेल्या ‘सैयारा’च्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
‘सैयारा’ यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मोजक्याच चित्रपटांपैकी एक ठरला आहे. ‘सैयारा’ने ३०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. नवख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रकॉर्ड मोडले आहेत. ‘सैयारा’ने १८ व्या दिवशी अडीच कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ३०२.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या चित्रपटाचे कलेक्शन ४७८ कोटी रुपये झाले आहे.
एकीकडे थिएटर्समध्ये ‘सैयारा’ची तुफान क्रेझ पाहायला मिळतेय, तर दुसरीकडे त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल अपडेट येत आहे. ‘सैयारा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. चित्रपट अजूनही थिएटरमध्येच चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे तो दिवाळीत ओटीटीवर येईल, अशी शक्यता आहे. ‘सैयारा’च्या निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
नेटफ्लिक्सवर येणार सैयारा
यशराज फिल्म्सचा हा पहिला चित्रपट असेल, जो थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या शेवटच्या क्रेडिट सॉन्गमध्ये नेटफ्लिक्सचा लोगो दाखवण्यात आला आहे. त्यानुसार YRF ने या चित्रपटाचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सला दिले आहेत, असं म्हटलं जात आहे.
‘सैयारा’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणं ही वायआरएफची नवी सुरुवात म्हणायला हवी. कारण आतापर्यंत वायआरएफचे सर्व चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जायचे. ‘सैयारा’ हा चित्रपट यशराज फिल्म्स आणि नेटफ्लिक्समधील एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल, अशी चर्चा आहे.
५० ते ६० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘सैयारा’ची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाने बजेटची रक्कम फक्त तीन दिवसांत वसूल केली होती. मागील १८ दिवसांपासून तो बॉक्स ऑफिस गाजवत आहे. मोठे स्टार नसलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित करून बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केले आहे.