आधी नवीन आलेला चित्रपट सिनेमागृहांत बघायची प्रेक्षकांमध्ये क्रेझ होती. पण अलीकडच्या काळात ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याचं वेड झपाट्याने वाढत आहे. प्रेक्षक दर आठवड्याला नव्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असतात. या आठवड्यात प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित मल्याळम चित्रपट ‘मीशा’ (Meesha) आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कथा, आयएमडीबी रेटिंग व तो कुठे पाहता येईल, ते जाणून घेऊयात.

चित्रपटाची कथा

‘मीशा’ हा चित्रपट अतिशय कमी बजेटमध्ये बनवला आहे, पण त्याची कथा आणि मांडणी एवढी दमदार आहे की समीक्षक आणि प्रेक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलं. ‘मीशा’ हा फक्त अॅक्शन थ्रिलर नाही, तर यात मैत्री, मत्सर, राजकारण, संघर्ष आणि अहंकार यांसारखे गंभीर विषयही दाखवले गेले आहेत. मित्रांमधील स्पर्धा आणि गुंतागुंतीच्या भावना कशा नात्यांमध्ये दुरावा आणू शकतात, ते दिग्दर्शकाने सिनेमात उत्तम पद्धतीने दाखवलं आहे.

जबरदस्त IMDb रेटिंग

‘मीशा’ची रिलीजपूर्वीच खूप चर्चा झाली होती. रिलीज झाल्यावर प्रेक्षकांना हा सिनेमा खूप भावला. विशेष म्हणजे ‘मीशा’चं IMDb वरचं रेटिंग चकित करणारं आहे. ‘मीशा’ला आयएमडीबीवर १० पैकी ९.४ रेटिंग मिळालं आहे. ‘मीशा’ हा चित्रपट एम. सी. जोसेफ यांनी दिग्दर्शित केला आहे. कथिर, शाईन टॉम चाको आणि सुधी कोप्पा यांसारख्या दमदार कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.

कुठे पाहायचा ‘मीशा’?

हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ ला थिएटरमध्ये रिलीज झाला. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्टने (Sun NXT) नुकतीच ‘मीशा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती. हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ पासून सन नेक्स्ट या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

का पाहावा ‘मीशा’ चित्रपट?

‘मीशा’ चित्रपटाबद्दल दाक्षिणात्य सिनेमाच्या चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर तो प्रेक्षकांना आवडला होता. ज्यांना तो थिएटरमध्ये पाहता आला नाही, ते आता ओटीटीवर पाहण्यास उत्सुक आहे. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहू शकता.