The Great Indian Kapil Show Legal Notice : कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे चर्चेत आहे. या शोचा तिसरा सीझन सुरु असून, आतापर्यंत अनेक या शोमध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. कपिलचा हा शो प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसून येतो. मात्र सध्या एका कारणामुळे हा शो कायदेशीर वादात अडकला आहे.

सेलिब्रिटी वकील अ‍ॅड. सना रईस खान यांनी निर्माता फिरोज ए. नाडियाडवाला यांच्या वतीने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, या शोमध्ये नाडियाडवाला यांच्या चित्रपटातील एक लोकप्रिय पात्र परवानगीशिवाय वापरण्यात आलं आहे.

न्यूज १८च्या वृत्तांनुसार, त्यांच्या परवानगीशिवाय ‘हेरा फेरी’ चित्रपटातील ‘बाबुराव गणपतराव आपटे’ हे लोकप्रिय पात्र शोमध्ये वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे नाडियाडवाला यांच्याकडून शोच्या निर्मात्यांना २५ कोटींची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

या नोटीसनुसार नाडियाडवाला यांचं म्हणणं आहे की, “बाबुराव हे पात्र आमच्या मेहनतीने आणि कल्पकतेने घडवलेलं एक पात्र आहे. तसंच अभिनेते परेश रावलजींनी यामध्ये आपला जीव ओतला आहे. कोणालाही हे पात्र परवानगीशिवाय वापरण्याचा हक्क नाही.”

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नाडियाडवाला यांच्या टीमने नेटफ्लिक्स आणि शोच्या निर्मात्यांवर कॉपीराईट कायदा १९५७ मधील कलम ५१ आणि ट्रेडमार्क कायदा अंतर्गत कलम २९ नुसार उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, ‘बाबुराव’ हे पात्र नाडियाडवाला कुटुंबाकडे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.

या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की शोच्या निर्मात्यांनी हे पात्र वापरण्यापूर्वी कुठलीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे, कॉपीराईट कायद्यातील कलम १४ नुसार त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे.

नोटीसमधील मागण्या:

१. सर्व संबंधित भाग नेटफ्लिक्स, सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरून तात्काळ हटवावेत
२. भविष्यात या पात्राचा वापर न करण्याचं लेखी आश्वासन.
३. २४ तासांत माफीनामा द्यावा.
४. २५ कोटींची नुकसानभरपाई दोन दिवसांत द्यावी.

दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल’ शोच्या तिसऱ्या सीझनचा शेवटचा भाग नुकताच प्रदर्शित झाला आणि या अंतिम भागात अक्षय कुमारने खास हजेरी लावली होती. यावेळी किकू शारदाने अक्षयच्या गाजलेल्या ‘हेरा फेरी’मधील ‘बाबुराव गणपतराव आपटे’ हे पात्र साकारलं. यांमुळेच आता हा शो एका कायदेशीर अडचणीत आला आहे.