ओटीटीवर सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ७ वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट रिलीज झाला होता. या बॉलीवूड चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय व क्लायमॅक्सची आजही चर्चा होते. या चित्रपटाचं नाव ‘अंधाधुन’ आहे. ‘अंधाधुन’ हा एक थरारक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच गुंतवून ठेवतो. अनपेक्षित वळणं, थरारक ट्विस्ट आणि रोमांचक कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
अंधाधुन सिनेमाची कथा
अंधाधुन चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी क्राइम थ्रिलर आहे. यातील कथा एका पियानोवादकाच्या आयुष्याभोवती फिरते. आंधळेपणाचं नाटक करणारा आकाश (आयुष्मान खुराना) एका खुनाचा साक्षीदार बनतो, त्यानंतर त्याच्या आयुष्यात इतके ट्विस्ट येतात की प्रत्येक वळणावर नवीन सस्पेन्स आणि सरप्राइज मिळतं. आकाशचा सामना एका चतुर, धूर्त आणि धोकादायक महिलेशी होतो, तेव्हा कथा पूर्णपणे बदलते. तिचे कारनामे असे असतात की चित्रपटात पुढे काय होईल, याची उत्सुकता वाढते. चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका अनपेक्षित आहे की तो पाहिल्यानंतर प्रेक्षक बराच काळ हे नक्की काय घडतंय, असा विचार करत राहतात.
चित्रपटातील कलाकार
‘अंधाधुन’ मधील कलाकारांबद्दल बोलायचं झाल्यास, या चित्रपटात आयुष्मान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे सारखे दमदार कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे. अंधाधुन हा भारतातील सर्वोत्तम थ्रिलर चित्रपटांपैकी एक मानला जातो.
अनोखे ट्विस्ट व दमदार कथेमुळे ‘अंधाधुन’ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आयुष्मान खुरानाचा उत्कृष्ट अभिनय, तब्बूची ग्रे शेड भूमिका आणि राधिका आपटेचा साधेपणा ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. श्रीराम राघवनचे दिग्दर्शन आणि चित्रपटाची पटकथा यामुळे अंधाधुन इतर थ्रिलर सिनेमांपेक्षा वेगळा ठरतो.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायचा चित्रपट?
जर तुम्ही अजूनपर्यंत ‘अंधाधुन’ पाहिला नसेल, तर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये पाहता येईल. या सिनेमाचा शेवट थक्क करणारा आहे. क्लायमॅक्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल. २ तास १८ मिनिटांचा ‘अंधाधुन’ बऱ्याच जणांचा आवडता चित्रपट आहे आणि ते हा चित्रपट पुन्हा-पुन्हा पाहत असतात. IMDb वर या चित्रपटाला ८.२ रेटिंग मिळाले आहे.