ठाणे महापालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या संयुक्त विद्यामाने देण्यात येणारा जनकवी पी. सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार, लेखक इसाक मुजावर यांना तर गंगा-जमुना पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. रविवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगयातनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मंगळवारी ठाणे महापालिका महापौर संजय मोरे यांनी ही नावे जाहीर केली आहेत.
गेल्या पंधरा वर्षांपासून ठाणे महापालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीच्या वतीने या पुरस्कारांचे वितरण करण्यात येत असून संगीत, चित्रपट, साहित्य, नाटय़, कला व शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. चित्रपटविषयक लेखन व समीक्षा या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे प्रसिद्ध लेखक व समीक्षक इसाक मुजावर यांना या वर्षीच्या जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम २५ हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर गेली अनेक र्वष आपल्या अभिनयाने हिंदी, मराठीसह चित्रपटांबरोबरच मराठी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ सिनेनाटय़ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना या वर्षीचा गंगा-जमुना पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम २१ हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार साहित्यिक तसेच विविध वृत्तपत्रांतून संत साहित्यावर स्तंभलेखन करणारे अरविंद दोडे, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार डॉ. वैदेही दप्तरदार, उदयोन्मुख कलाकार म्हणून ‘बाजीराव मस्तानी’ फेम अंगद म्हसकर यांना गौरवण्यात येणार आहे. रोख रक्कम ११ हजार आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. रविवार, २१ डिसेंबर रोजी होणारा पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून ठाण्यातील रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.