Pakistani Actors on Pahalgam Terror Attack : जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांनीही पोस्ट केल्या आहेत.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान व अभिनेत्री हानिया आमिर यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पोस्ट केल्या आहेत. पहलगाम हल्ल्याची बातमी ऐकून दुःख झालं, अशी पोस्ट फवाद खानने केली आहे.
फवाद खानची पोस्ट –
Fawad Khan Post on Pahalgam Terror Attack :फवाद खानने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. “पहलगाममधील भीषण हल्ल्याच्या बातमीने दुःख झालंय. आमच्या संवेदना आणि प्रार्थना या भीषण घटनेतील पीडितांच्या पाठीशी आहेत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासाठी हिंमत मिळावी, त्यांना सावरायचं बळ मिळो यासाठी आम्ही प्रार्थना करतो,” असं फवाद खानने लिहिलं.

हानिया आमिरची पोस्ट –
Hania Aamir Reacts on Pahalgam Terror Attack :अभिनेत्री हानिया आमिरनेही पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. “कुठेही घडलेली कोणतीही शोकांतिका ही सगळ्यांसाठीच एक शोकांतिका असते. या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या निष्पाप लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत. आपण दुःखात आणि सुखात एकत्र आहोत. जेव्हा निष्पाप लोक आपला जीव गमावतात तेव्हा त्या वेदना फक्त त्यांच्या नसतात, आपल्या सर्वांच्या असतात. आपण कुठे राहतो, हे महत्त्वाचं नाही. दु:खाची भाषा सर्वांची सारखीच असते,” असं हानिया आमिरने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यात डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. डोंबिवलीतील तीन रहिवासी या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. तसेच एका लहान मुलाच्या बोटाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी हे तिघे या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. या सर्वांवर डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले.