टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीदेखील खूप प्रसिद्ध आहे. अनेक म्युझिक अल्बमनंतर पलकने सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला.
या चित्रपटातील पलकच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ती सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. आता पलक तिवारी अलीकडेच तिची आई श्वेता तिवारीशी सतत तुलना केली जात असल्याबद्दल बोलली आहे.
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत, पलकने तिची आई श्वेताशी सतत तुलना केली जात असल्याबद्दल सांगितले, “तिच्या दशकांच्या कारकिर्दीत आणि यशाचा विचार करता तिच्या आईशी तुलना करणे योग्य नाही” असे तिला वाटते. पलक म्हणाली, “खरं सांगायचं तर, मला काही फरक पडत नाही. जर काही असेल तर ती माझ्या आईची प्रतिक्रिया असायला हवी. तिने आजपर्यंत जे काही मिळवलं आहे, त्यानंतर तिची तुलना तिच्या अर्ध्या वयाच्या व्यक्तीशी करणे हे योग्य नाही. मी प्रत्यक्षात खूप आनंदी आहे. मला वाटत नाही की मी तिच्यासारखी दिसते, पण माझे स्वप्न आहे की मी एक दिवस तिच्यासारखी होईन.”
‘रोमियो एस३’बद्दल पलक काय म्हणाली?
पलकने गुड्डू धनोआ दिग्दर्शित तिच्या नवीनतम प्रोजेक्ट ‘रोमियो एस३’बद्दलदेखील सांगितले. या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगदरम्यान तिला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले याबद्दल विचारले असता पलक म्हणाली, “माझ्यासाठी हा एक मोठा क्षण होता. हा माझा पहिला चित्रपट होता, कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्याची माझी पहिलीच वेळ होती. मी प्रत्येक गोष्टीत पूर्णपणे नवीन होते. गुड्डू सरांनी मला या चित्रपटाचा भाग होण्याची संधी दिली. त्यांनी इतक्या मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे आणि दिग्दर्शक म्हणून त्यांचा खूप आदर केला जातो. त्यांच्याबरोब जोडले जाणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती आणि अॅक्शन चित्रपट नेहमीच मजेदार असतात, लोकांना ते आवडते.”
पलक तिवारीचा ‘रोमियो एस ३’ कधी प्रदर्शित होईल?
पलक ‘रोमियो एस ३’मध्ये पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यामध्ये ती ठाकूर अनुप सिंगबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पलकचा शेवटचा रिलीज झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट ‘द भूतनी’ होता, ज्यामध्ये संजय दत्त, मौनी रॉय आणि सनी सिंग यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. तो बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नाही.