Palestine’s Nadeen Ayoub announces she is representing Palestine at Miss Universe 2025 : येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी थायलंडमध्ये होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स २०२५’ स्पर्धेत पॅलेस्टाईनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नदीन आयूब निवडली गेली आहे, याबद्दल तिने स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितलं. दुबईमध्ये राहणाऱ्या नदीन या पॅलेस्टिनी सौंदर्यवतीने सांगितलं की, सध्याच्या त्यांच्या देशातील गंभीर परिस्थिती पाहता, ही भूमिका फार मोठ्या जबाबदारीने पार पाडण्याची भावना त्यांच्यात आहे.

१३ ऑगस्ट रोजी नदीन आयूबने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत, ती मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेत पॅलेस्टाईनचं प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा केली. ही स्पर्धा पॅलेस्टाईनसाठी इतिहासातली पहिलीच अशी संधी असल्याचं तिनं सांगितलं.

नदीन म्हणाली की, ही स्पर्धा तिच्यासाठी केवळ एक सौंदर्यासाठीचं मंच नाही, तर पॅलेस्टिनी लोकांचे, विशेषतः महिलांचे आणि मुलांचे आवाज जगापर्यंत पोहोचवण्याचं एक व्यासपीठ आहे. तसंच पॅलेस्टाईनमधील संघर्षाच्या पलीकडे जाऊन तिथल्या लोकांची सर्जनशीलता आणि अनेक दुर्लक्षित गोष्टी ती या मंचाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.

व्हिडीओमध्ये नदीनने ठामपणे हेही सांगितलं की, पॅलेस्टिनी महिलांनाही स्वप्नं आहेत, त्यांच्यात कौशल्य आहे. त्या अनेक अडथळ्यांवर मात करत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरातील लोकांनी ज्या महिलांचं योगदान, अस्तित्व आणि संघर्ष ओळखायला हवा, त्यांच्यासाठी ती आवाज बनू इच्छिते. तिच्या या प्रवासातून इतर मुलींनाही प्रेरणा मिळावी अशी तिची इच्छा आहे.

या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतंय की, मी ‘मिस युनिव्हर्स २०२५’ स्पर्धेत पॅलेस्टाईनचे प्रतिनिधित्व करणार आहे. आजच्या घडीलाही जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष आमच्या मातृभूमीकडे लागले आहे, तेव्हा ही भूमिका माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. हे एक असं व्यासपीठ आहे, जिथून मी पॅलेस्टिनी लोकांचे, विशेषतः आमच्या महिला आणि मुलांचे प्रतिनिधित्व करू शकते.”

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नदीन म्हणते, “पहिल्यांदाच पॅलेस्टाईन मिस युनिव्हर्स स्पर्धेत अधिकृत प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार असल्याची घोषणा करताना मला अभिमान वाटतो. जेव्हा पॅलेस्टाईन, विशेषतः गाझा, मोठ्या दुःखातून जात आहे तेव्हा मी त्या लोकांचा आवाज म्हणून उभी आहे.

दीन अयूब कोण आहे?

Thenationalnews.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, नदीन अयूब ही पॅलेस्टिनी सौंदर्यवती आहे. २०२२ साली तिला ‘मिस पॅलेस्टाईन’ हा किताब मिळाला होता. याच वर्षी तिने इतिहास रचला – ती ‘मिस अर्थ’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत पॅलेस्टाईनकडून सहभागी झालेली पहिली स्पर्धक ठरली आहे. विशेष म्हणजे, टॉप ५ फायनलिस्ट्समध्ये स्थान मिळवण्यात ती यशस्वी ठरली आहे.