बहुचर्चित व बहुप्रतिक्षित ‘पानिपत’ या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटातील ‘मर्द मराठा’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्यानंतर आता अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं ‘मन मै शिवा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हर हर महादेव म्हणत अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री क्रिती सनॉन ‘मन मै शिवा’ गाण्यावर ठेका धरत आहेत. या गाण्यातून पुन्हा एकदा चित्रपटातील भव्यदिव्यता अधोरेखित होत आहे.
हे गाणं कुणाल गांजावाला. दिपांशी नगर आणि पद्मनाभ गायकवाड यांनी गायले असून जावेद अख्तर यांनी ते शब्दबद्ध केले आहे. चित्रपटात अर्जुन सदाशिवरावांची भूमिका साकारत आहे. ‘मन मै शिवा’ गाण्यात सदाशिवरावांसोबत इतर सैनिक मिळून विजयाचा जयजयकार करताना दिसत आहेत. तर क्रिती यामध्ये पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. क्रितीसुद्धा या गाण्यात ठेका धरताना दिसते.
अत्यंत दिमाखदार पद्धतीने या गाण्याच्या लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील पारंपरिक पोशाख परिधान करुन नृत्य सादर करण्यात आले तर अर्जुन व क्रितीने लेझीम खेळत त्यांना साथ दिली.
मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट आधारित आहे. अर्जुन, क्रितीसोबतच संजय दत्त यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. संजय दत्त यात अहमद शाह अब्दालीची साकारत आहे.