बहुप्रतिक्षित व बहुचर्चित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. पानिपत येथे झालेल्या पेशवे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यादरम्यान झालेल्या पानिपतच्या युद्धासंदर्भात हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. आज (मंगळवारी) दुपारी बारा वाजता गोवारीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली. संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सनॉन, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. मात्र अनेकांना हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मराठीमध्ये गोवारीकर यांनी मराठ्यांचा इतिहास मांडायला हवा होता अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी हा चित्रपट मराठीमध्ये डब करावा अशी मागणी केली आहे.
भव्यदिव्य स्वरुपात गोष्ट मांडणारे दिग्दर्शक म्हणून गोवारीकरांना यांना ओळखले जाते. पुन्हा तसाच भव्यदिव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणल्याचे ट्रेलरची सुरुवात पाहताच लक्षात येते. या ट्रेलरमध्ये सदाशिवरावांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त तर क्रिती सनॉन पार्वतीबाईंची भूमिकेत दिसणार आहेत. या ट्रेलरमधील भव्यदिव्यपणा डोळे दिपवून टाकणार आहे. ट्रेलरमधील संवादही दमदार आहेत. मात्र एका मराठी दिग्दर्शकाच्या नजरेतून साकारण्यात आलेला मराठ्यांच्या पराक्रमावर भाष्य करणारा हा चित्रपट मराठीमधुन बनवायला हवा होता अशा अनेक प्रतिक्रिया गोवारीकर यांच्या ट्विटवर मराठी प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
मराठ्यांचा इतिहास मराठीत हवा
Release this movie with #Marathi audio in #Maharashtra
मराठ्यांचा इतिहास #मराठी भाषेत देखील बघायला मिळालाच पाहिजे..#म— Swapnil (@Mee_Swapnil2) November 5, 2019
आपलाच इतिहास हिंदीतून पाहायचा
आपला ईतिहास आपण हिंदी मधे का म्हणून पहावा पाणिपत मराठी त यायलाच पाहिजे
— Prasad Patil (@Iamprasad18) November 5, 2019
विनंती समजा…
आशुतोष गोवारीकर सर तुम्ही या मराठी मातीचे सुपुत्र आहात पाणिपत हा आपल्या मातीचा ईतिहास आहे त्यामुळे हा चित्रपट मराठीत आलाच पाहिजे तुम्ही आमची विनंती मान्य कराल ही अपेक्षा #PanipatTrailer @ekikaranmarathi
— Prasad Patil (@Iamprasad18) November 5, 2019
माणसं मराठी मातीतली तर चित्रपटही मराठीत हवा
चित्रपट या त्या त्या राज्यांचा किंवा समाजाचा आरसा असतात आगामी चित्रपट पाणिपत आणि तानाजी हे आपल्याचं मातीतले आहेत त्यामुळे हे मराठी मध्ये सुद्धा यावेत अशी आपण मागणी करायला हवी @ekikaranmarathi @Prasanna_rj123 @ajaydevgn @AshGowariker #Panipattrailer
— Prasad Patil (@Iamprasad18) November 5, 2019
मराठीत डब करा
@AshGowariker निर्माते मराठी असतिल तर #पानिपत मराठीत डब करण्यास काही हरकत नसावी.#Panipat #Panipattrailer #panipat
— रोhit Sandbbhor (@sandbhor_rohit) November 4, 2019
दरम्यान, अशाप्रकारे केवळ पानिपतच नाही तर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा चित्रपटही मराठीत असावा अशी मागणी अनेकांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला तेव्हा केली होती. दरम्यान पानिपत या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहे. २०१६ मध्ये ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटानंतर आता त्यांचा ‘पानिपत’ प्रदर्शित होणार आहे. ‘मोहेंजोदारो’ने बॉक्स ऑफीसवर फारशी कमाई केली नव्हती. मात्र ‘पानिपत’कडून प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहेत. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलने संगीत दिले आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी हा ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
