बी. आर. चोप्रांनी दिग्दर्शित केलेल्या महाभारत या मालिकेचा प्रभाव अनेकांवर आजही कायम आहे. या मालिकेचा प्रभाव दीर्घकाळ राहण्याचं कारण म्हणजे यातील पात्र निवड. कर्ण, अर्जुन, दुर्योधन, शकुनी सगळीच पात्रं आणि ते साकारणारे कलाकार यांची भट्टी अगदी चांगली जमली होती. याच मालिकेत कर्ण साकारणाऱ्या पंकज धीर यांचं निधन झालं. पंकज कपूर यांची गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज सुरु होती. मात्र ती अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कर्णाच्या भारतातील दोन मंदिराबाबत.

पंकज धीर यांनी कर्णाच्या भूमिकेविषयी काय सांगितलं होतं?

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पंकज धीर यांनी सांगितलं होतं की कर्णाच्या भूमिकेसाठी त्यांनी खूप तयारी केली होती. तसंच कर्णाबाबत बरंच वाचनही त्यांनी केलं होतं. बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत काम करण्यापूर्वी पंकज धीर यांनी दोन तासांच्या एका चित्रपटातही भूमिका केली होती, या चित्रपटात ते कर्णाच्या भूमिकेत होते. मात्र त्यावेळी त्यांना फार कुणी महत्त्व दिलं नाही. पण महाभारतातील कर्णाच्या भूमिकेने त्यांना ओळख दिली. पंकज धीर म्हणाले होते की माझे बरेच सीन पुनित इस्सर (दुर्योधन) आणि गुफी पेंटल (शकुनी) यांच्यासह होते. दोघंही अभिनयात पारंगत होते त्यामुळे माझ्या भूमिकेचा कस लागत होता. मी त्या दोघांसह अनेक सीन करुनही माझी वेगळी ओळख निर्माण करु शकलो याचा मला आनंद आहे असं धीर म्हणाले होते.

कर्णाच्या भारतातील मंदिरांबाबत काय म्हणाले होते पंकज धीर?

भारतात कर्णाची दोन मंदिरं आहेत. जिथे कर्णाची पूजा केली जाते. करनल या ठिकाणी बस्तर या ठिकाणी ही दोन मंदिरं आहेत. पंकज धीर म्हणाले होते की मी या दोन्ही मंदिरांमध्ये गेलो आहे. या ठिकाणी लोकांनी प्रेमापोटी माझा आठ फुटी पुतळाही उभारला आहे असंही पंकज धीर यांनी सांगितलं. तसंच लोक या पुतळ्याचीही पूजा करतात त्यांचं हे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे असंही पंकज धीर म्हणाले होते. DNA ने हे वृत्त दिलं आहे.

महाभारतानंतर एकाही मालिकेत कर्ण साकारला नाही-पंकज धीर

पंकज धीर यांनी एकदा असंही सांगितलं होतं की महाभारतातील त्यांची कर्णाची भूमिका खूप गाजली. जी पाहून त्यांना पुन्हा तशीच भूमिका करण्याच्या इतर ऑफरही आल्या. पण त्या त्यांनी केल्या नाहीत. मला पैसे जास्त हवे होते म्हणून मी या भूमिका नाकारल्या नाहीत. मी चांगले पैसे कमवत होतो. लोकांनी माझ्या भूमिकेवर प्रेम केलं आणि विश्वास दाखवला. मला लोकांच्या भावनांवर कुठलाही अन्याय करायचा नव्हता. त्यामुळे मी इतर मालिकांमध्ये एकसारखीच म्हणजेच कर्णाची भूमिका साकारली नाही. असं पंकज धीर यांनी सांगितलं होतं.