परी…. हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्यासमोर डिस्नेमधल्या प्रिन्सेस डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात. मोठे डोळे आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य असलेली ती परी आपल्याला आठवते. पण, अनुष्का शर्माची परी त्या पऱ्यांसारखी नाहीये. ही परी पूर्णतः त्या पऱ्यांच्या विरुद्ध आहे. या परीच्या चेहऱ्यावरील भाव काहीसे घाबरवणारे आहेत. आपल्या नजरेतून आणि चेहऱ्यावरील भावनांनी समोरच्याच्या मनात भीती निर्माण करणारे भाव या परीच्या चेहऱ्यावर आहेत. या सर्व गोष्टी अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ चित्रपटाच्या पोस्टरवर पाहावयास मिळतात. आजपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होत असून, पोस्टर पाहिल्यावर अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. अनुष्काचीच निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा पोस्टर आपल्यावर नक्कीच प्रभाव टाकण्यात यशस्वी झाला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

वाचा : …आणि मौनी सलमानच्या जास्तच जवळ गेली

अनुष्का शर्मा निर्माती म्हणून कधीच सावध खेळी खेळत नाही. तिने आतापर्यंत निर्मिती केलेले चित्रपट हटके असल्याचे आपण पाहिले आहे. मग तो ‘एनएच १०’ असो वा भूतावरील आधारित विनोदी ‘फिल्लौरी’ चित्रपट. याच रांगेत तिचा आगामी ‘परी’ चित्रपटही येत आहे. यामध्ये अनुष्का आणि परमब्रता चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसतील. या बंगाली अभिनेत्याला आपण विद्या बालनच्या ‘कहाणी’ या चित्रपटात पाहिलं आहे. या चित्रपटाने प्रोसित राय दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून, याचे चित्रीकरण मुंबई आणि कोलकाता येथे होईल.

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीत अनुष्का म्हणालेली की, क्लीन स्लेट फिल्म्स नेहमीच उत्तम आणि गुंतवून ठेवणाऱ्या कथांवर लक्ष केंद्रित करते. नवीन कलाकारांना संधी दिल्यामुळे आम्हाला नवीन कल्पना आणि अभिनव संकल्पना मिळतात. ‘परी’ची कथा अप्रतिम असून माझा यावर पूर्ण विश्वास आहे. क्लीन स्लेट आणि क्रिअर्ज एण्टरटेंन्मेन्टची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.

इम्तियाझ अलीच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटात ती शाहरुखसोबत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल. त्याचसोबत ती आनंद एल रायच्या चित्रपटासाठी शाहरुख आणि कतरिना कैफसोबत चित्रीकरण करत आहे.