‘छबीदार छबी मी तो-यात उभी’,’ देरे कान्हा चोळी अन् लुगडी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ अशा कितीतरी दमदार लावणी नृत्याने रंगतदार ठरलेला ‘पिंजरा’ हा चित्रपट आता डॉल्बी साउंड सिस्टीम या नवीन तंत्रामध्ये १८ मार्च रोजी पुन्हा एकदा थाटात झळकणार आहे. निर्माता-दिग्दर्शक-संकलक व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा मराठीतील पहिला रंगीत चित्रपट आहे. १९७२ सालातल्या ३१ मार्च रोजी तो सर्वप्रथम झळकला तेव्हा प्लाझा हे त्याचे प्रमुख चित्रपटगृह होते. आतादेखिल प्लाझा येथेच हा चित्रपट झळकेल. तेव्हा राज्यातील अनेक शहरांत पिंजराने रौप्य व सुवर्ण महोत्सवी यश संपादले.
या चित्रपटात संध्या, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, वत्सला देशमुख, माणिक राज, गोविंद कुलकर्णी, कृष्णकांत दळवी, भालचंद्र कुलकर्णी इत्यादींच्या भूमिका आहेत. तर कथा-पटकथा अनंत माने, संवाद शंकर पाटील यांचे आहेत. तर जगदीश खेबुडकर यांच्या गीतांना राम कदम यांचे संगीत आहे. चित्रपटातील सर्वच्या सर्व बारा गाणी आज ४५ वर्षांनंतरही लोकप्रिय आहेत हे विशेष.
‘कुण्या राजाची तू गं राणी’, ‘बाई मला इश्काची इंगळी डसली’, ‘दिसला गं बाई दिसला’, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ इ. गाण्यांचा त्यात समावेश आहे.