कबीर बेदी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी चार वेळा लग्न केले आहे. त्यांची पहिली पत्नी प्रतिमा बेदी होती, जी आता या जगात नाही. ती एक प्रसिद्ध मॉडेल व डान्सर होती. कबीर आणि प्रतिमा यांना पूजा व सिद्धार्थ अशी दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा सिद्धार्थ बेदी याने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आत्महत्या केली होती. पूजाने तिच्या आईच्या आयुष्यातील काही माहित नसलेल्या गोष्टींना उजाळा दिला. ज्यात जगाबद्दलचे त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन ते कैलास मानसरोवरातील त्यांच्या रहस्यमय मृत्यू यांसारख्या गोष्टींचा समावेश होता.
पूजा बेदीने तिच्या दिवंगत आईची आठवण काढली आहे आणि सांगितले आहे की, तिच्या आईने शेवटच्या क्षणी स्वतःला सर्वांपासून दूर केले होते. ती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगली आणि तिला तिच्या शरीरावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणे नको होते. १९९८ मध्ये कैलास मानसरोवराच्या यात्रेदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला तिच्या मृत्यूची कल्पना होती आणि तिने तिच्या मृत्यूपूर्वी सर्व तयारी केली होती. पूजा बेदी काय म्हणाली ते जाणून घेऊया.
पूजा बेदीने शेअर केली आईची आठवण
खरे तर, पूजा बेदीने अलीकडेच दी इंडियन एक्स्प्रेसच्या स्क्रीनशी संवाद साधला. त्यादरम्यान पूजाला तिच्या आईची आठवण आली आणि तिने सांगितले की, तिच्या आईचा मृतदेह आतापर्यंत सापडलेला नाही. पूजा सांगते की, तिची आई म्हणायची की, तिला अंत्यसंस्कार करणे यासारख्या विधींमध्ये सहभागी व्हायचे नव्हते. तिला असे वाटायचे की, निसर्गाच्या सान्निध्यात मृत्यू हा तिच्यासाठी एक भव्य अंत्यसंस्कार असेल आणि पूजा म्हणते की, ते तसेच घडले. तिच्या शेवटच्या क्षणी प्रतिमा निसर्गाचा एक भाग बनली.
पूजाने तिच्या आईचा स्वभाव कसा होता हे सांगितले, म्हणाली, “आमच्या आईला आम्ही गृहपाठ करायचो ते आवडत नव्हतं. ती म्हणायची की मी तुम्हाला शाळेत नेण्यासाठी घरचं काम देत नाही, मग ते तुम्हाला घरी करण्यासाठी शाळेचे काम कसे देऊ शकतात? हा माझा वेळ आहे तुमच्याबरोबरचा, तुम्ही गृहपाठ करू नका.” पूजा पुढे म्हणाली, “मला अजूनही आठवते की आमची आई आम्हाला वाळूवर एबीसीडी लिहायला शिकवायची. ती एक आनंदी स्त्री होती.”
प्रतिमा बेदी यांनी १२ पानांचे पत्र लिहिलेले
पूजा बेदीने सांगितले की, तिच्या आईने त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे मृत्युपत्र लिहिले होते. त्यांनी सर्व कागदपत्रे, दागिने व मालमत्ता यांची कागदपत्रे माझ्याकडे सोपवली होती. पूजाने सांगितले की, तिच्या आईने १२ पानांचे पत्रही लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी पूजाला तिचे बालपण, नातेसंबंध, लग्न, मुले व डान्स याबद्दल सांगितले होते.
या पत्राचा संदर्भ देत पूजा बेदी म्हणाली की, तिच्या आईने लिहिले होते की, ती कुल्लूमध्ये आहे. पूजाच्या म्हणण्यानुसार, प्रतिमाने पुढे सर्व देवी-देवतांचे आभार मानले आणि खूप आनंद व्यक्त केला होता. पूजाने सांगितले की, त्यानंतर तिची आई कधीही परत आली नाही. आईला आठवत पूजा बेदी म्हणाली की, ती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगली आणि स्वतःच्या अटींवरच मरण पावली.