बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट ही तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. अशातच तिने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केलाय. अभिनेत्री आणि निर्माती पूजा भट्टने तिचा नवरा मनीष मखिजा याच्यासोबत घेतलेल्या घटस्फोटानंतर ती दुसरं लग्न करणार का ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यानंतर अभिनेत्री पूजा भट्टने तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री पूजा भट्टने नुकतीच फिल्मफेअर मासिकाला एक मुलाखत दिलीय. या मुलाखतीत ती तिच्या खागजी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर अगदी मनमोकळ्यापणाने गप्पा मारताना दिसून आली. यावेळी जेव्हा तिला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ती खुल्या मनाने व्यक्त होताना दिसून आली. तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना अभिनेत्री पूजा भट्ट म्हणाली, “हल्ली महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या यशाचा झेंडा उंचावत आहेत. ते कोणत्याच बाबतीत पुरूषांपेक्षा काही कमी नाहीत. पण हीच यशस्वी महिला जेव्हा घरी जाते तेव्हा तिला ऐकवलं जातं की तू तर नोबेल प्राइज मिळवलंस, पण घरात जेवण काय बनवलंय? तू आई आहेस की नाही? तुझं लग्न झालंय की नाही? असे अनेक प्रश्न महिलांना विचारले जातात.”
माझं जीवन अपूर्ण नाही !
या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री पूजा भट्ट म्हणाली, “मी दुसरं लग्न करणार काही नाही, हे कायम मला विचारलं जातं. दोघे आनंदाने राहिलं पाहिजे यापेक्षा दोघे आनंदी असले पाहिजेत, या विचारांमध्ये मी लहानाची मोठी झाली आहे. या सगळ्या अनुभवातून मी गेलेली आहे. मी अनेकदा तसे प्रयत्न देखील केले आणि लोकांना सुद्धा हाच सल्ला देत आले आहे. मी माझं आयुष्य कसं जगायचं हे मी स्वतःच ठरवते. त्यामूळे माझं जीवन मला अपूर्ण वाटत नाही.”
अभिनेत्री पूजा भट्टने २००३ साली होस्ट मनिष मखीजासोबत लग्न केलं होतं. पूजा भट्टने ज्यावेळी मनीष मखीजाशी लग्न करण्याचा इरादा जाहीर केला, तेव्हा सगळ्यांना नवल वाटलं होतं. ‘पाप’ या चित्रपटात दोघे एकत्र काम करत होते. स्वभावाने गंमतीदार असलेला मनीष पूजाचा जोडीदार झाला. तिचा घट्ट मित्र झाला. ती निर्माण करत असलेल्या सिनेमात मनीष तिची मदत करू लागला. पण तिरसट स्वभावाच्या पूजाने ११ वर्षाचा संसार केल्यानंतर अचानक त्याच्यापासून वेगळी झाली. २०१४ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर मात्र तिने दुसरं लग्न केलं नाही. का केलं नाहीस, असा प्रश्न पत्रकारांनी तिला अनेकदा केला. तेव्हा चांगला नवरा मिळत नाहीये, असं एकदा तिने हसत हसत उत्तर दिलं होतं.
View this post on Instagram
‘बॉम्बे बेगम्स’चं यश पाहून आनंदी आहे पूजा
नुकतंच अभिनेत्री पूजा भट्टने ‘बॉम्बे बेगम्स’मधून डिजिटल विश्वात डेब्यू केलंय. ‘बॉम्बे बेगम्स’मधून पूजा भट्ट पुन्हा एकदा अभिनयाकडे वळली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सीरिजमध्ये पूजाने रानी इरानीची भूमिका साकारलीय. यात ती एका यशस्वी उद्योजिकेसोबतच एका आईच्या भूमिकेत दिसून आली. या सीरिजमध्ये तिच्या अभिनयाचं भरपूर कौतुक केलं जातंय. या सीरिजबद्दल तिचा जेव्हा विचारलं तेव्हा तिने या सीरिजला मिळत असलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.