सध्या सगळीकडे ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ची चर्चा सुरू आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे कट्टर फॅन्स तर या सिरिजची आतुरतेने वाट बघत होते. इतरही प्रेक्षक अगदी आवडीने ही सीरिज बघत आहे आणि त्याविषयी बोलत आहे. २२ ऑगस्टपासून ही सीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली आहे. दर सोमवारी अमेरिकेबरोबरच भारतातसुद्धा याचा नवीन भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या वेबसीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या कथेच्या २०० वर्षं आधीची गोष्ट सांगण्यात येणार आहे. जॉर्ज आरआर मार्टिन यांच्या ‘फायर अँड ब्लड’ या कादंबरीवर ही वेबसीरिज बेतलेली आहे.
खरंतर गेल्या महिन्याभरापासूनच या वेबसीरिजचं प्रमोशन सुरू होतं. त्यामुळे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फॅन्स ही सीरिज बघणार आहेतच, पण याशिवाय GOT बघितलं नसलेल्या प्रेक्षकांसाठीसुद्धा या सीरिजच्या प्रमोशनमध्ये प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. या वेबसीरिजचं बजेट आणि त्याच्या प्रमोशनवर खर्च केलेला पैसा हे ऐकून नक्कीच सगळे अचंबित होणार आहेत. या वेबसीरिजचं बजेट तब्बल २०० मिलियन डॉलर इतकं आहे. या बजेटच्या जवळपास अर्धा खर्च फक्त याच्या प्रमोशनसाठी वापरण्यात आला आहे. अंदाज लावायचा झाला तर तब्बल ८०० करोड एवढा पैसा खर्च केला आहे.
एवढंच नव्हे तर या मार्केटिंगसाठी वापरलेला पैसा वसूल झाला असल्याचा दावा वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचे सीईओ डेविड झसलाव यांनी केला आहे. त्यांच्या या मार्केटिंगमुळे त्यांचा हा शो अमेरिकेत तब्बल १३० मिलियन लोकांपर्यंत पोहोचला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या मार्केटिंगमागे केवळ एकच उद्देश होता की जुन्या GOT फॅन्ससकट नवीन प्रेक्षकांनासुद्धा या वेबसीरिजकडे आकर्षित करायचं. यामध्ये HBO आणि वॉर्नर ब्रदर्स दोघांनाही चांगलंच यश मिळालं आहे.
आणखीन वाचा : सारा अली खान आणि जान्हवी कपूर दिसणार एकत्र, ‘या’ खास कारणासाठी शेअर केली स्क्रीन
‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ ही वेबसीरिज अमेरिकेत HBO Max या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे आणि भारतात हॉटस्टारच्या माध्यमातून ती लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याच्या मार्केटिंगमुळे अमेरिकेत HBO Max हा ओटीटी प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही वेबसीरिज साऱ्या जगभरात पोहोचवण्यात मार्केटिंग टीमला यश मिळालं आहे. या सीरिजमध्ये एकूण १० भाग आहेत. पुढच्या सोमवारी या वेबसीरिजचा दूसरा भाग येणार असून याचा शेवटचा भाग २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
