मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनंतर हिच्यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संपत जे. राम याचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्याने २२ एप्रिल रोजी नेलमंगला येथील स्वतःच्या घरी आत्महत्या केली. संपतच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की संपतला काही काळ काम मिळायचे बंद झाल्याने त्याचा प्रचंड त्रास त्याला होत होता. त्यामुळे मानसिक तणावाखाली त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचं म्हंटलं जात आहे. मात्र, या प्रकरणावर अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आणखी वाचा : Video : आधी सेल्फी घेतला अन्… शाहीद कपूरला भेटल्यावर तरुणीने केलं ‘असं’ काही की नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल
सध्यातरी अभिनेत्याचा मृतदेह कर्नाटकातील नेलमंगला येथील एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. संपत जे राम याचा अंत्यसंस्कार त्यांच्या घरी एनआर पुरा येथे २३ एप्रिल रोजीच होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर अनेक स्टार्सनी संपतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
‘अग्निसाक्षी’ टीव्ही शोमधील संपतचा सहकलाकार विजय सूर्या यांनी ‘इटाइम्स’शी बोलताना संपतबद्दल खुलासा केला तेव्हा ते म्हणाले, “तो खूप दिवसांपासून एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होता.” याचबरोबर कन्नड चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनीही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. संपतचे वर्षभरापूर्वीच लग्न झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.