Salaar box office collection Day 1: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा बहुप्रतीक्षित ‘सालार’ हा अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या ‘डंकी’ समोर येत असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनात बरेच अडथळे निर्माण झाले. पण अखेर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जबरदस्त कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. ‘साहो’, ‘राधे श्याम’, ‘आदिपुरुष’सारखे एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर प्रभासच्या ‘सालार’कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या.

प्रेक्षकांच्या या अपेक्षा ‘सालार’ने पूर्ण केल्या आहेत. ‘डंकी’चे नकारात्मक रिव्यू वाचून बरेच प्रेक्षक दुसऱ्या दिवशी प्रभासच्या ‘सालार’कडे वळल्याचं त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन स्पष्ट होत आहे. पहिल्याच दिवशी प्रभासच्या ‘सालार’ने ‘अॅनिमल’, ‘पठाण’, ‘जवान’ या तीनही चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. या तिघांनाही मागे पछाडत ‘सालार’ २०२३ चा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

आणखी वाचा : Dunki Box office collection 1: ‘जवान’ आणि ‘पठाण’च्या तुलनेत शाहरुख खानच्या ‘डंकी’ ची कमाई कमी, पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘सालार’ने सर्व भाषांमध्ये मिळून ९५ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. या कमाईपैकी सर्वाधिक कमाई आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा या राज्यात केली आहे. या दोन्ही राज्यांत या चित्रपटाने जवळपास ७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. याबरोबरच केरळ आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत १२ कोटी अन् ५ कोटी रुपयांची प्रत्येकी कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘डंकी’ आणि ‘सालार’ यांची जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु ‘डंकी’ला मिळालेल्या अत्यंत कमी प्रतिसाद ‘सालार’च्या पथ्यावरच पडला आहे. अर्थात बऱ्याच लोकांनी ‘सालार’वर आणि प्रभासवरही जबरदस्त टीका केली आहे. शिवाय या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळाल्याने आधीच बऱ्याच प्रेक्षकांची निरशा झाली होती. ‘सालार’मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुतती हासन, जगपती बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.