हॉलिवूडच नाही तर बॉलिवूडमध्येही आता ‘मी टू’ मोहीम जोर धरू लागली आहे. अनेक अभिनेत्री महिला धाडसानं त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात आलोक नाथ, नाना पाटकेर, विकास बहल यांसारखी मोठी नावं समोर येत आहे. फक्त बॉलिवूडपुरताच ही चळवळ मर्यादित न राहता दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील महिलाही आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात बोलत आहे.

तेव्हा ‘मी टू’ मोहिमेबद्दल प्रकाश राज यांनीदेखील आपली महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. फक्त बॉलिवूडच नाही, तर क्रीडा, माध्यम, राजकारण इथेही ही मोहीम राबवली पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे. अमुक एक महिला दहा वीस वर्षांनंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज का उठवत आहे असं विचारणं मुर्खपणाचं आणि चुकीचं आहे. ‘आता का विचारण्यापेक्षा आत्ताच का नाही? असा प्रश्न विचारला पाहिजे. बदल घडवण्याची हिच वेळ आहे त्यामुळे प्रत्येक महिलांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले.

प्रत्येक क्षेत्रात महिलांवर अन्याय करणारे आहेत पण त्यांच्यावर उशीरा का होईना पण महिला आवाज उठवत आहेत अशावेळी आपण त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे, असं प्रकाश राज म्हणाले. फक्त मी टूच नाही तर यापूर्वी राजकारणातील अनेक गंभीर विषयावर प्रकाश राज यांनी सडेतोड मत मांडलं आहे. अगदी मोदी सरकारविरोधात बोलायलाही ते घाबरले नाही. आपल्या याच भूमिकेमुळे चित्रपटात काम मिळणंही बंद झालं आहे असंही ते एका मुलाखतीत म्हणाले होते.