तेलंगणा पोलिसांनी बेटिंग अ‍ॅपला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj), विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) आणि राणा डग्गुबाती (Rana Daggubati) यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवार, २० मार्च रोजी आलेल्या एएनआयच्या वृत्तानुसार, सायबराबादमधील मियापूर पोलिसांनी ३२ वर्षीय व्यावसायिक फणींद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. याबद्दल आता विजय देवरकोंडा आणि प्रकाश राज यांनी यांनी याप्रकरणी गुरुवारी त्यांचे स्पष्टीकरण दिले.

स्पष्टीकरण देताना प्रकाश राज यांनी, त्यांना अद्याप पोलिसांकडून कोणतंही समन्स मिळालेलं नाही; परंतु जर त्यांना समन्स मिळालं, तर ते नियमांचं पालन करतील, असं सांगितलं. तसेच या प्रकरणी काही गोष्टी स्पष्ट करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून ते उत्तर देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याबद्दल त्यांनी असे म्हटले, “२०१६ मध्ये मी एका गेमिंग अ‍ॅपला पाठिंबा दिला होता आणि त्या संदर्भात त्यांनी एक वर्षाचा करार केला होता; पण कालांतरानं मला हे योग्य वाटलं नाही. त्यामुळे तो करार पुढे वाढवला नाही”.

प्रकाश राज पुढे म्हणाले, “हे प्रकरण आठ-नऊ वर्षांपूर्वीचं आहे. पण. त्यानंतर मी कोणत्याही बेटिंग अ‍ॅपचा प्रचार केलेला नाही. मला वाटतं की, ही कंपनी २०२१-२२ मध्ये दुसऱ्या कोणाला तरी विकली गेली असावी आणि जेव्हा त्यांनी माझ्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावर वापरल्या तेव्हा मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. कारण- तेव्हा माझा त्यांच्याशी कोणताही करार नव्हता.” या व्हिडीओच्या शेवटी प्रकाश राज यांनी, तरुणांनी जुगाराला बळी पडू नये, असे आवाहन केले.

प्रकाश राज यांच्याबरोबरच विजय देवरकोंडाच्या टीमनेही एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे लिहिले आहे, “जनतेला आणि सर्व संबंधितांना कळविण्यात येत आहे की, विजय देवरकोंडा यांनी कौशल्यावर आधारित खेळांसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करण्याच्या मर्यादित उद्देशानं एका कंपनीबरोबर अधिकृतपणे करार केला आहे. त्यांचं समर्थन केवळ अशा प्रदेशांपुरते मर्यादित होते. जिथे कौशल्यावर आधारित ऑनलाइन खेळांना कायदेशीररीत्या परवानगी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राणा डग्गुबतीच्या टीमनेदेखील एक अधिकृत निवेदन जारी केले. त्यामध्ये असे म्हटले आहे, “अभिनेत्यानं कौशल्यावर आधारित खेळांसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करण्यासाठी एका कंपनीबरोबर करार केला होता, जो २०१७ मध्ये संपला. कोणताही करार करण्यापूर्वी अभिनेत्याची कायदेशीर टीम सखोल आढावा घेते. त्यामुळे टीमकडून गोष्टींचा सखोल आढावा घेतला गेला होता आणि त्यानंतरच त्यांनी या कंपनीची जाहिरात करण्यास सहमती दर्शविली होती”.