गेल्या काही दिवसांपासून अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके मुख्य भूमिकेत असणारा ‘पांडू’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटात भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेसोबत अभिनेते प्रविण तरडेंची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच थाटात पार पडला.
‘पांडू’ हा निखळ विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठी सिनेसृष्टीत विनोदी चित्रपटांची एक मोठी परंपरा आहे. दादा कोंडके यांचे चित्रपट असो की सचिन-अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट, यातील विनोदाबरोबरच त्याचेही गाण्यांनी, संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली. विनोद आणि संगीताची हीच परंपरा कायम राखण्याचं काम ‘पांडू’ही करणार आहे. एकाहून एक धमाल गाण्यांनी सज्ज असलेल्या या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच थाटात पार पडला. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी यांच्यासह दिग्दर्शक विजू माने, झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी आणि संगीतकार अवधूत गुप्ते उपस्थित होते. यासोबतच गीतकार समीर सामंत गायक आदर्श शिंदे, गायिका वैशाली सामंत, अबोली गीऱ्हे यांचीही उपस्थिती होती.
‘पांडू’ चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘दादा परत याना’ आणि ‘बुरुम बुरुम’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी लिहिलं असून त्यांना या गाण्यासाठी अनुक्रमे आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांची साथ मिळाली आहे. याशिवाय सर्वांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ‘जाणता राजा’ हे गीत समीर सामंत यांनी लिहिलं असून त्याला अबोली गिऱ्हे या नव्या गायिकेसोबत आदर्श शिंदेचा रांगडा आवाज लाभला आहे. ‘बॅडलक खराब हाय’ या गाण्याचे शब्द वैभव जोशी यांचे असून ते रामानंद उगळे यांनी गायलं आहे तर ‘केळेवाली’ हे गीत विजू माने यांनी लिहिलं असून ते अवधूत गुप्ते आणि संपदा माने यांनी गायलं आहे.
एकंदरीत विविध रंगांच्या आणि ढंगाच्या गाण्यांनी परिपूर्ण असलेला ‘पांडू’ चित्रपटाचा हा म्युझिक अल्बम सर्वांनाच भावणार अशी खात्री यावेळी सर्वांनी व्यक्त केली. ‘पांडू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडुओने केली आहे. हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.