समाजाच्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब नाटकातून उमटले पाहिजे. काही अपवाद वगळता सध्या ते होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करतानाच नाटक कधीही मरणार नाही, ते सुरूच राहील, असा आशावाद ज्येष्ठ नाटककार आणि नाटय़ दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला.
मुंबई विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट’ने विद्यापीठाच्या कलिना संकुलातील सरस्वती सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महारंग परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या ‘डेथ ऑफ द प्ले राइट’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे अध्यक्ष वामन केंद्रे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. आळेकर यांच्यासह महेश दत्तानी, नंदकिशोर आचार्य हे वक्ते म्हणून सहभागी झाले होते.
महाराष्ट्राला नाटककार आणि नाटकांची मोठी परंपरा लाभली आहे. नाटककाराने नाटक लिहिले असले तरी रंगभूमीवर ते दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्यकार आणि सगळ्यांच्या सामूहिक कामगिरीतून सादर होते. नाटकातून समाजातील राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि समाजमन प्रतिबिंबित व्हावे, अशी अपेक्षा आळेकर यांनी व्यक्त केली.
नंदकिशोर आचार्य म्हणाले, संहितेशिवाय नाटक असूच शकत नाही. जोपर्यंत भाषा टिकून राहील तोपर्यंत नाटककाराची भूमिका कायम असेल. तर वामन केंद्रे यांनी सांगितले की, नाटक ही सामूहिक सृजनाची प्रक्रिया असून त्यात नाटकाशी संबंधित सगळ्यांचे महत्त्वाचे योगदान असते. नाटककार हा त्या नाटकाचा पाया आहे. नाटक म्हणजे एक कविता असते. त्यातून दृश्यबंध उभा राहणे आवश्यक आहे. नाटक आज चौथी मिती शोधत असून त्यासाठी नाटक हे वेगळ्या प्रकारे लिहावे आणि शोधावे लागेल.
महेश दत्तानी यांनीही नाटककार हा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. सुरुवातीला विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे प्रमुख शफाअत खान यांनी प्रास्ताविक केले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Present image of soceity should reflected on drama satish alekar
First published on: 28-03-2014 at 06:29 IST