Priya Marathe Passed Away : छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सीरिजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले आहे. काही काळापासून ती कर्करोगाने त्रस्त होती. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया केवळ ३८ वर्षांची होती. तिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

प्रिया मराठेने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘या सुखांनो या’ ही तिची पहिली मालिका होती. त्यानंतर हिंदी मालिकांमध्येही ती झळकली होती. प्रियाच्या मालिकांबरोबरच तिचे खासगी आयुष्यदेखील चर्चेत असायचे. प्रिया आणि शंतनू यांची लव्हस्टोरीदेखील खूप हटके आहे. एका जवळच्या मैत्रिणीमुळे त्यांची ओळख झाली होती.

२४ एप्रिल २०१२ रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून झाली. श्रीकांत मोघे यांचा मुलगा व अभिनेता शंतनू मोघे याच्याबरोबर प्रियाचे अगदी थाटात लग्न झाले. मात्र, त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली होती हे फार कमी लोकांना माहीत आहे. प्रिया मूळची ठाण्याची. शूटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे. तिची रूममेट शर्वरी लोहकरेमुळे तिची शंतनूबरोबर ओळख झाली. शर्वरी आणि शंतनू ‘आई’ मालिकेत एकत्र काम करीत होते.

मालिकेच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या पार्टीत पहिल्यांदा प्रिया आणि शंतनूला जास्त वेळ एकत्र बोलायची संधी मिळाली. त्या रात्रीच्या गप्पांनी दोघांच्याही आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. हळूहळू फोन, मेसेजेस सुरू झाले. रोजचे बोलणे मैत्रीपलीकडे जाऊन वेगळ्या नात्याचे रूप घेऊ लागले. दीड वर्ष डेट केल्यानंतर शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. तो तिला फिल्मसिटीतील एका जागी घेऊन गेला. चांदण्याच्या प्रकाशात गुडघ्यांवर बसत शंतनूने प्रियाला प्रपोज केले होते. प्रियाही त्याच्यावर तितकीच जिवापाड प्रेम करीत होती. त्यामुळे हो म्हणायला तिला वेळच लागला नाही; पण काही काळ दोघांनीही आपले नाते गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

दोघांच्या या नात्याबद्दल घरच्यांना काही कल्पना नव्हती; मात्र एका पुरस्कार सोहळ्यात शंतनूने स्टेजवरच प्रियाचे नाव घेतले आणि गोष्ट घरच्यांपर्यंत पोहोचली. दोन्ही कुटुंबांनीही या नात्याला होकार दिला. शेवटी २४ एप्रिल २०१२ रोजी या दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले. प्रिया आणि शंतनूची ही लव्हस्टोरी साधी असली तरी त्यात खरी गोडी आहे; ना घरच्यांचा विरोध, ना अडथळे. मात्र,आता प्रियाच्या जाण्यामुळे शंतनू आणि कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.

२००५ साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेमधून प्रिया मराठेने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधील तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः तिच्या नकारात्मक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

हिंदी मालिकांमध्ये तिच्या प्रवासाची सुरुवात ‘कसम से’ या मालिकेतील ‘विद्या बाली’ या भूमिकेपासून झाली. पुढे ‘पवित्र रिश्ता’मध्ये ‘वर्षा’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’मध्ये ‘ज्योती मल्होत्रा’च्या भूमिकांनी तिला घराघरात पोहोचवले.