Dheeraj Kumar Passes Away : प्रसिद्ध बॉलीवूड, टेलिव्हिजन अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ७९ वर्षीय धीरज कुमार यांना तीव्र न्यूमोनिया झाला होता, ज्यामुळे त्यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे.
धीरज कुमार काल रात्रीपासून व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीयांनीही त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आणि त्यांना गंभीर स्थितीत दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडण्यापूर्वी ते इस्कॉन मंदिरात पोहोचले होते, जिथे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला
त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार शोक व्यक्त करीत आहेत. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच कुटुंबाकडूनही याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी धीरज कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर त्यांनी लिहिले आहे की, सुप्रसिद्ध अभिनेते व निर्माते धीरज कुमार आता आपल्यात नाहीत हे जाणून खूप दुःख झाले. ओम शांती.”

‘या’ चित्रपटांमध्ये केलंय काम
धीरज कुमार हे एक ज्येष्ठ कलाकार होते, ज्यांनी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रात वर्षानुवर्षे काम केले आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात अभिनेता म्हणून केली आणि १९७० च्या दशकात ‘दीदार’, ‘रातों का राजा’, ‘बहारों फूल बरसाओ’, ‘शराफत छोड़ दी मैंने’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘मन भरों सजना’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यांनी सुमारे २१ पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे, ज्यामध्ये अलीकडील ‘सज्जन सिंग रंगरूट’, ‘इक संधू हुंडा सी’, ‘वॉर्निंग २’ व ‘माझैल’ या चित्रपटांमधील त्यांच्या कामाचे कौतुक झाले.