लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची यशोगाथा मांडणारा ‘बहिर्जी’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये मातीआड लपलेल्या अंगारसारखे धगधगते काम करणारे बहिर्जी नाईक इतिहासात फारसे दिसले नाहीत. मात्र तरी शत्रूच्या अनेक मोहिमा मोडून काढण्याचे काम बहिर्जी नाईक यांनी केले. त्यांचीच यशोगाथा ‘बहिर्जी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बहिर्जी’  या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात आहेत. अशा काळात महाराजांची प्रत्येक योजना यशस्वी करणारे बहिर्जी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात. त्यांच्या योजना इतक्या गुप्त असायच्या की, त्यांचा मागोवा घेणेसुद्धा शक्य नव्हते. मात्र अशा काळात स्वराज्य हे स्वप्न या मातीत रुजवणारे शिवराय आणि या स्वप्नासाठी जीव उधळायलासुद्धा तत्पर असणारे मावळे या साऱ्यांचे अवलोकन केले तर त्यातूनच बहिर्जी नावाची वीण हळुवार उलगडत जाते. हेच दाखवण्याचा प्रयत्न ‘बहिर्जी’ या चित्रपटातून आम्ही केला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा वस्तुनिष्ठ वेध घेऊनच या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. सध्या या चित्रपटाचे पहिले पुष्प भेटीला आले असून लवकरच याबाबतचे सारे चित्र स्पष्ट करू, असेही ते म्हणाले.