‘भावसरगम’ या कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर यांची भावना

गाणे इतक्याच वेळेत संपले पाहिजे, हा विचार मनात बांधून अनेक गायक गायन करीत असतात. मात्र, असे बांधून घेऊन मी कधीच गायलो नाही. रंगमंचावर स्वतला सोडून देत मी मज हरपून गातो.. असे सांगत ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘मी जणू माझ्यातच विसर्जित होतो,’ अशी भावना व्यक्त केली.

‘भावसरगम’ या कार्यक्रमाला पन्नास वष्रे पूर्ण झाल्यानिमित्ताने पं. मंगेशकर यांचा ‘शिरीष थिएटर्स’तर्फे सत्कार करण्यात आला. उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत रसिकांनी या ‘भावगंधर्वा’ला मानवंदना दिली. ज्येष्ठ पाश्र्वगायिका उषा मंगेशकर आणि शिरीष रायरीकर या वेळी उपस्थित होते.

मंगेशकर म्हणाले,‘‘ लोक काय म्हणतील याची पर्वा न करता मी मुक्तपणे गातो. स्वत:ला बांधून न घेता गायन केल्यानंतर मफिलीमध्ये रंग भरतो आणि हेच त्या गायनाचे यश असते. मी गाताना स्वतला विसरून जातो. कसा दिसतोय, दाढी किती वाढली, ध्वनिवर्धक कोठे आहे अशा गोष्टीदेखील माहीत नसतात.’’

‘एखादा कार्यक्रम पन्नास वष्रे सतत करत राहणे हे अवघड काम आहे. त्यासाठी प्रचंड प्रवास केला. सुरुवातीला ट्रकमधून जावे लागायचे. तसाही गेलो.

प्रसंगी कष्ट पडले ते सहन करून हा कार्यक्रम उभा केला,’ असेही त्यांनी सांगितले. प्रशांत नासेरी, जितेंद्र अभ्यंकर, मधुरा दातार, विभावरी जोशी आणि राधा मंगेशकर यांनी ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘तू तेंव्हा तशी’, ‘जय देव जय देव जय जय शिवराया’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘म्यानातून उसळे तलवारीची पात’, ‘सागरा प्राण तळमळला..’ अशी ‘भावसरगम’ कार्यक्रमातील गीते सादर केली.