Comedian Jaswinder Bhalla Death : प्रसिद्ध कॉमेडियन व पंजाबी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जसविंदर भल्ला यांचे आज शुक्रवारी सकाळी (२२ ऑगस्ट) मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असे सांगितले जात आहे की, ते बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांच्या निधनाने पंजाबी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या अभिनेत्याने त्यांच्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले.
जसविंदर भल्ला आजारी होते आणि त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ६५ वर्षीय कॉमेडियनने येथे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घराबाहेर स्टार्स आणि चाहत्यांची गर्दी आहे. चाहते खूप भावूक झाले आहेत आणि त्यांच्या आवडत्या कॉमेडियनचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमेडियनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शनिवारी (२३ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता मोहालीतील बलोंगी स्मशानभूमीत केले जातील.
जसविंदर भल्ला यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर पंजाबी चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. त्यांचा जन्म ४ मे १९६० रोजी लुधियाना येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी १९८८ मध्ये ‘छनकटा ८८’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि १० वर्षांनंतर १९९८ मध्ये ‘दुल्ला भाटी’ हा चित्रपट केला. त्यानंतर १९९९ मध्ये ‘माहौल ठीक है’ या चित्रपटात ते इन्स्पेक्टर जसविंदर भल्ला यांच्या भूमिकेत दिसले.
त्यानंतर त्यांनी ‘सरदार जी’, ‘जिने मेरा दिल लुटिया’, ‘जट्ट अँड ज्युलिएट’, ‘पॉवर कट’, ‘कॅरी ऑन जट्टा’, ‘मुंडे कमाल दे’, ‘किटी पार्टी’, ‘कॅरी ऑन जट्टा ३’ यांसारखे चित्रपट केले. त्यांनी दिलजीत दोसांझसारख्या मोठ्या स्टार्सबरोबर अनेक मोठ्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.