अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटातील कलाकार, त्यांचे डायलॉग, गाणी सर्व काही सुपरहिट ठरलं. त्यामुळे आता ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटांची चलती असल्याचं पाहायला मिळत आहे. कोविडदरम्यान आलेल्या ‘पुष्पा’नंतर ‘केजीएफ’, ‘कांतारा’, ‘आरआरआर’,पासून ‘सालार’पर्यंत कित्येक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नुसता धिंगाणा घातला.
दाक्षिणात्य चित्रपटांच्या या झंजावातामध्ये बॉलिवूड चित्रपट मागे पडत आहेत. बॉलिवूडकडे दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही अशी चर्चा गेले काही वर्ष आपल्या कानावर आलीच असेल. पण अल्लू अर्जुनचं मात्र याबाबतीत वेगळं मत आहे. नुकतंच त्याने ‘न्यूज ९ प्लस’शी संवाद साधतांना याबद्दल भाष्य केलं आहे. बॉलिवूडच्या या पडत्या काळाबद्दल त्याने भाष्य केलं आहे.
अल्लू अर्जुन म्हणाला, “बॉलिवूडचा सध्या पडता काळ आहे यामुळे आपण त्यांना वाईट म्हणणं योग्य नाही. हा बॉलिवूडवर अन्याय आहे. या चित्रपटसृष्टीने गेल्या ६०-७० वर्षांपासून एकाहून एक सरस चित्रपट आपल्याला दिले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटावर बॉलिवूडचा सर्वात जास्त प्रभाव आहे. आमच्यात बंधुभाव आहे, आमच्या मनात एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे.”
इतकंच नव्हे तर आपण येत्या काळात साऱ्या जगावर राज्य करणार आहोत असंही अल्लू अर्जुनने भाष्य केलं. तो म्हणाला, “भारत लवकरच महासत्ता बनणार आहे. येणाऱ्या १० ते १५ वर्षांत आपण साऱ्या जगावार राज्य करणार आहोत. भारत अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. यामुळे सगळ्या इंडस्ट्रीला फायदा होणार आहे. खासकरून मनोरंजनविश्वाला याचा चांगलाच फायदा होणार आहे. मग ते चित्रपट असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म, देशाची प्रगती होत असल्याने आपल्या इंडस्ट्रीलाही चांगलाच फायदा होत आहे.” येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘पुष्पा २’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहता येणार आहे.