Pushpa 2 Premier Screening in Hyderabad : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच सगळे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. संपूर्ण देशभरात आज ( ५ डिसेंबर ) हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला असून, इथून पुढे काही दिवस प्रेक्षकांना थिएटरमध्ये ‘पुष्पाराज’ पाहायला मिळणार आहे. मात्र, ‘पुष्पा २’ आणि त्यामधल्या कलाकारांची हिच क्रेझ हैदराबादमधल्या एका महिलेसाठी जीवघेणी ठरली आहे.
हैदराबादमधील एका थिएटरमध्ये बुधवारी सायंकाळी ‘Pushpa 2 : द रुल’च्या प्रीमियरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अल्लू अर्जुनचे चाहते मोठ्या संख्येने थिएटर परिसरात आले होते. या घटनेला गालबोट लागलं असून, या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाल्याचं समोर आलं आहे. या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या गर्दीत तिचा नऊ वर्षांचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा : Pushpa 2 Movie Review : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा चित्रपट कसा आहे? सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…
हैदराबाद येथील संध्या थिएटरबाहेर ही घटना घडली. या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी आरटीसी चौकातल्या संध्या थिएटरमध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. स्क्रिनिंगदरम्यान अभिनेता अल्लू अर्जुन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान ही घटना घडली. या महिलेचं वय ३५ वर्ष होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटगृहात केवळ सिनेमा आणि मुख्य कलाकारांनाच पाहण्यासाठीच नव्हे तर निर्मिती टीमच्या सदस्यांना पाहण्यासाठी सुद्धा हजारो लोक जमले होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त करण्यात आला होता. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला. यादरम्यान, प्रचंड गर्दीत थिएटरचा गेटही ढासळल्याचं समोर आलं आहे.
#WATCH | Telangana: Actor Allu Arjun arrives at Sandhya theatre in Hyderabad for the premiere show of his film 'Pushpa 2: The Rule'. pic.twitter.com/Pkzra7Y1ja
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI (@ANI) December 4, 2024
दरम्यान, ‘Pushpa 2’ चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फॉसिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ४०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा विक्रमी आकडा पार करेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.