बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळखले जाते. त्यांनी असे स्टारडम मिळवले, जे आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याने पाहिले नाही किंवा त्याची कल्पनाही केली नाही.
पण, तुम्हाला माहीत आहे का जेव्हा त्यांचे स्टारडम हळूहळू कमी होऊ लागले तेव्हा त्यांचा स्वभावही बदलू लागला. त्यांच्या वागण्याचा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर परिणाम होऊ लागला. कारण- दारू प्ययाल्यानंतर ते चिडचिड करायचे आणि रागवायचे.
अलीकडेच ‘मेरी सहेली’शी झालेल्या संभाषणात, त्यांची गर्लफ्रेंड अनिता अडवाणी यांनी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. अनिता म्हणाल्या, “मी २००० मध्ये त्यांच्याबरोबर राहू लागले. त्यावेळी ते खूप शांत असायचे; पण ड्रिंक केल्यानंतर ते रागावायचे.”
अनिता अडवाणी पुढे म्हणाल्या, “मला वाटत नाही की, ही निराशा त्यांच्या कारकिर्दीबद्दल होती; पण ते लहानसहान गोष्टींमुळे चिडायचे आणि कोणी काही बोलले, तर खूप लवकर रागवायचे. ते त्यावेळी फक्त त्यांचा राग काढत होते. कारण- त्यांच्या आत खूप ओझे होते. त्यांना राग कुठेतरी बाहेर काढावा लागायचा आणि तरीही त्यांच्याइतके स्टारडम इतर कोणीही पाहिले नव्हते. ते त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. पण, जेव्हा तुम्ही त्या उंचीवरून खाली येता तेव्हा स्वाभाविकपणे नैराश्य येते आणि मग राग येऊ लागतो.”
अनिता अडवाणी म्हणाल्या, “मानसिकदृष्ट्या त्यांना फक्त त्यांच्या सर्व भावना व्यक्त करण्याचा मार्ग हवा होता. ते मला म्हणायचे की, जर मी तुझ्याशी भांडलो नाही तर मी कोणाशी भांडेन? जेव्हा ते भांडायचे, तेव्हा कधी कधी मी फक्त त्यांची खोली घाणेरडी आहे, असे म्हटल्यामुळे ते चिडायचे. मग ते म्हणायचे की हो, मी घाणेरडा आहे; फक्त तूच स्वच्छ आहेस; पण त्यांनी मला कधीही शारीरिक इजा केली नाही. मी काही चुकीचे बोलले किंवा केले, तर ते विनोद म्हणून मला हळूच मारायचे; पण ते कधीही हिंसक झाले नाहीत.”
अनिता म्हणाल्या की, त्या राजेश खन्ना यांच्याबरोबर खूप भांडायच्या. त्या म्हणाल्या, “आम्ही खूप भांडायचो आणि आम्ही किती वेळा वाद घातला हे मी मोजूही शकत नाही. मी एक डायरी लिहायचे आणि मला वाटायचे की, मी त्यात फक्त आमच्या भांडणांबद्दल लिहिले आहे. मी माझ्या बहिणीच्या घरी धावत जायचे आणि त्यांचा फोन उचलण्यास नकार देत असे. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाला पाठवत असत, जो एक मोठा हॅम्पर आणि एक छोटी चिठ्ठी आणत असे. मी काहीही न घेता आणि पत्र न वाचता, ते परत पाठवत असे. मग काही दिवसांनी जेव्हा ते मला मनवायचे तेव्हा मी त्यांच्याकडे परत जायचे. कारण- मलाही त्यांची आठवण यायची.”