हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून आजही राजेश खन्ना यांच्याकडे पाहिलं जातं. अनोख्या अभिनय शैलीने नेहमीच अनेकांची मनं जिंकलेल्या राजेश खन्ना यांचा आज वाढदिवस. खरं तर आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी आपल्यासोबत आहेत. १९ डिसेंबर १९४२ रोजी अमृतसर येथे जन्म झालेल्या राजेश खन्ना यांना ‘आराधना’ या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. विशेष म्हणजे कलाविश्वात ते राजेश खन्ना या नावाने ओळखण्यापेक्षा ‘काका’ या नावाने परिचित आहेत. मात्र त्यांना हे नाव नेमकं का पडलं हे फार मोजक्या जणांना माहित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. जवळपास १८० चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. यात ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘खामोशी’, ‘सच्चा झूठा’, ‘गुड्डी’, ‘कटी पतंग’, ‘सफर’, ‘दाग’, ‘अमर प्रेम’, ‘प्रेम नगर’, ‘नमक हराम’, ‘रोटी’, ‘सौतन’, ‘अवतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातच त्यांचा आनंद हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांना ‘काका’ या नावाने का बोलावतात हे सांगितलं होतं.

राजेश खन्ना यांना का म्हणतात काका?

”काका’ हा शब्द खरं तर पंजाबी आहे. पंजाबी भाषेत लहान मुलाला ‘काका’ असं म्हणतात. ज्यावेळी मी कलाविश्वात पदार्पण केलं, त्यावेळी माझं वय कमी होतं. त्यामुळे मला बरेच ‘काका’ असं म्हणायचं. त्यानंतर हेच नाव पुढे प्रचलित झालं आणि चाहतेदेखील मला ‘काका’ याच नावाने ओळखू लागले”, असं राजेश खन्ना यांनी सांगितलं.

राजेश खन्ना यांचं खरं नाव जतीन खन्ना असं असून त्यांनी ‘आखरी खत’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्याकाळी राजेश खन्ना यांनी सलग १५ सुपरहिट चित्रपट देत एक नवा विक्रम चित्रपटसृष्टीत प्रस्थापित केला होता. त्यांच्या या चित्रपटांनी खऱ्या अर्थाने एक काळ गाजवला. विविध भूमिकांना न्याय देत रुपेरी पडद्यावर त्या भूमिका जिवंत करण्याच्या त्यांच्या या अंदाजाने अनेकांनाच भुरळ घातली होती.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh khanna birthday special news ssj
First published on: 29-12-2019 at 09:20 IST