हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या कुटुंबियांना त्यांची काळजी नव्हती, असा आरोप अनिता अडवाणी यांनी केला. राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी यांचे लिव्ह-इन नातेसंबंध होते. राजेश खन्ना यांची प्रकृती ढासळल्याचे समजेपर्यंत त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याविषयी काहीच काळजी वाटत नव्हती, असा गौप्यस्फोट अनिता यांनी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीरम्यान केला. राजेश खन्ना यांची जोडीदार म्हणून आपल्याला कायदेशीर हक्क आणि आर्थिक मोबदला मिळावा, अशी अनिता यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयात राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल, कन्या ट्विंकल आणि रिंकी यांच्यासह जावई अक्षय कुमार यांच्याविरुद्द तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, रिंकी यांना या प्रकरणाशी काहीही देणे-घेणे नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्धची तक्रार रद्दबातल ठरविली आहे.
वकिल मृणालिनी देशमुख यांनी न्यायालयात अडवाणी यांची बाजू मांडताना, राजेश खन्ना आजारी असताना आपल्या अशिल अनिता अडवाणी यांनी त्यांची काळजी घेतल्याचे सांगितले. राजेश खन्ना यांच्या उतारवयात अनिता याच त्यांची काळजी घेत होत्या. मात्र, राजेश खन्ना यांची प्रकृती ढासळल्याची बातमी बाहेर कळल्यानंतर अचानकपणे राजेश खन्ना यांच्या कुटुंबियांना त्यांच्याविषयी प्रेम आणि ममत्व वाटू लागल्याचे मृणालिनी देशमुख यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर अक्षय कुमार आणि ट्विंकल यांनी अनिता यांना खन्ना कुटुंबिय राहत असलेले आशीर्वाद निवासस्थान सोडण्यासही सांगितले.
मात्र, हे सर्व आरोप विरोधी पक्षाच्या वकिलांकडून फेटाळण्यात आले. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी आणि शिरिष गुप्ते यांनी न्यायालयात अक्षय कुमार, डिंपल आणि ट्विंकल यांची बाजू मांडली. अनिता अडवाणी या आमच्या अशिलांबरोबर कधीही एकत्र राहिल्याच नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याकडून करण्यात आलेले घरगुती हिंसेचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा जेठमलानी आणि गुप्ते यांनी केला. त्या आमच्या अशिलांबरोबर एकाच घरात राहत होत्या हे अडवाणी यांनी प्रथम सिद्ध करावे, अन्यथा त्यांची तक्रार रद्दबातल ठरविली जावी, असेही यावेळी बचावपक्षाच्या वकिलांनी सांगितले.